अमेझॉनच्या किंडल पेपरव्हाईट ई-रीडरची नवीन आवृत्ती

0
किंडल पेपरव्हाईट (२०१८), amazon kindle paperwhite 2018

अमेझॉनने आपल्या किंडल पेपरव्हाईट या ई-रीडरची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

अमेझॉनने आधीच पेपरव्हाईट हे मॉडेल सादर केले असून याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता किंडल पेपरव्हाईट (२०१८) या नावाने याचीच अद्ययावत आवृत्ती बाजारपेठेत उतारण्यात आली आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा हे वजनाने १० टक्के हलके तसेच सडपातळ आहे. अर्थात ते वापरण्यासाठी अतिशय सुलभ असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये आधीपेक्षा जास्त एलईडी देण्यात आलेले आहेत. यामुळे याच्या डिस्प्लेवर कुणीही अतिशय सुलभ आणि त्रासाविना वाचू शकणार आहे. हे रीडर आयपीएक्स८ या मानांकनानुसार तयार करण्यात आलेले आहे. अर्थात हे वॉटरप्रूफ असल्यामुळे अगदी पावसातही याचा वापर करता येणार आहे. यामध्ये आधीप्रमाणेच ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात होम स्क्रीन हे विशेष फिचरदेखील देण्यात आलेले आहे. याच्या मदतीने सर्च आणि रेकमेंडेशन सुलभपणे करता येणार आहे. याचा वापर करून मल्टीपल रीडींग सेटींगदेखील करता येणार आहे.

किंडल पेपरव्हाईट (२०१८) या मॉडेलमध्ये ८ आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेजचा पर्याय देण्यात आलेला आहे. यामुळे कुणीही युजर अगदी विपुल प्रमाणात ई-बुक्स सेव्ह करू शकतो. यातील ८ जीबी मॉडेल हे वाय-फाय कनेक्टीव्हिटीयुक्त आहे. तर ३२ जीबी स्टोअरेजचे मॉडेलमध्ये फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट प्रदान करण्यात आलेला आहे. या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य १२,९९९ आणि १७,९९९ रूपये आहे. अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून याची नोंदणी सुरू करण्यात आली असून १४ नोव्हेंबरपासून याला प्रत्यक्ष खरेदी करता येणार आहे. यासोबत कंपनीने काही ऑफर्सदेखील दिलेल्या आहेत. यात ग्राहकाला तीन महिन्यांपर्यंत किंडल अनलिमिटेडचे सबस्क्रीप्शन मिळणार आहे. यात युजर अमर्याद ई-बुक्सच्या वाचनाचा आनंद घेऊ शकणार आहे. यानंतर १५० रूपये प्रति-महिना इतक्या दराने याला वापरता येणार आहे. तर या मॉडेलसाठी कंपनीने दोन वर्षाची वॉरंटीदेखील जाहीर केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here