देशातील भारतीय भाषांमधील प्रथम स्मार्टफोन हा गुजराती भाषेसाठी तयार करण्यात आला असून लवकरच तो हिंदी आणि मराठीतही उपलब्ध होणार आहे.
आपल्या देशात स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. मात्र अनेकांना इच्छा आणि यासाठी लागणारे पैसे असूनही स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भाषा होय. सर्व स्मार्टफोन्सची आज्ञावली इंग्रजी भाषेत असल्याने अनेकांना याचा वापर करणे गैरसोयीचे होते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आयआयटीतल्या राकेश देशमुख, आकाश डोंगरे व सुधीर बंगारामबंदी या तीन पदवीधरांनी स्थापन केलेल्या ‘मो फर्स्ट सोल्युशन्स’ या या कंपनीने गुजराती भाषेत पहिला देशी स्मार्टफोन तयार केला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात आयकान्ससह सर्व आज्ञावली या गुजराती भाषेत आहेत. याचसोबत याच्या माध्यमातून गुजराती ते इंग्रजी व इंग्रजी ते गुजराती भाषांतर अगदी सुलभरित्या ‘स्वाईप’ करून करता येते. अवघ्या ५९९० रूपयात उपलब्ध असणारा ‘फर्स्ट टच ए १०’ हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या जेली बीन प्रणालीवर चालतो. चार इंच स्क्रीन असणार्या या स्मार्टफोनचा पार्श्वभाग हा अत्यंत सुलभ असा आहे. यात दोन मेगापिक्सलचा फ्लॅशसहीत कॅमेरा दिला असून रॅम ५१२ एमबी इतकी आहे. याची स्टोअरेज क्षमता चार जीबी इतकी असून ती ३२ जीबीपर्यत विस्तार करणे शक्य आहे. यात ड्युअल सीम, जीपीएस नेव्हिगेशन आदी सुविधा असून हा स्मार्टफोन थ्रीजी, वाय फाय व ब्लुटुथला सपोर्ट करतो.
‘मो फर्स्ट सोल्युशन्स’ची वेबसाईट
येत्या वर्षांमध्ये सुमारे ५० कोटी स्मार्टफोनधारक हे भारतीय भाषा बोलणारे असतील. यामुळे आम्ही भारतीय भाषांना प्राधान्य देत असल्याची माहिती ‘फर्स्ट टच’चे सहसंस्थापक तथा सीइओ राकेश देशमुख यांनी दिली आहे. लवकरच मराठी आणि हिंदीतही स्मार्टफोन येणार आहेत. याचसोबत येत्या वर्षभरात ३५०० ते १२,५०० या किंमतपट्टयात या कंपनीतर्फे दहा स्मार्टफोन लॉंच करण्यात येणार आहेत. स्वाईप टेक्नॉलॉजी, मंत्रा किबोर्ड व गुजराती ऍप्स यामुळे ‘फर्स्ट टच ए १०’ हा स्मार्टफोन लोकांच्या पसंतीस उतरणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला.
पहा: ‘फर्स्ट टच ए १०’ची कार्यप्रणाली…