इंटेक्सचा नवीन बजेट स्मार्टफोन

0
इंटेक्स स्मार्टफोन

इंटेक्स कंपनीने पुन्हा एकदा किफायतशीर दराच्या रेंजमध्ये आपला इन्फी ३३ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

इंटेक्स कंपनीने आपल्या इन्फी ३ या स्मार्टफोनसोबत इन्फी ३३ हे मॉडेलदेखील लाँच केले आहे. मध्यंतरी इंटेक्स, मायक्रोमॅक्स, लाव्हा आदी कंपन्यांनी किफायतशीर दरात नवनवीन मॉडेल्स सादर करून मोठ्या प्रमाणात आगेकूच केली होती. विशेष करून भारतीय बाजारपेठेत मोठी उलाढाल होणार्‍या एंट्री लेव्हलच्या सेगमेंटमध्ये भारतीय कंपन्यांची कामगिरी ही लक्षणीय राहिली होती. तथापि, शाओमीसह अन्य चीनी कंपन्यांनी आता या विभागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे भारतीय कंपन्या पीछाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, इंटेक्स या भारतीय कंपनीने इन्फी ३ या मॉडेलसोबत इन्फी ३३ हा स्मार्टफोनदेखील बाजारपेठेत उपलब्ध केला आहे. यात आधीच्या मॉडेलपेक्षा थोड्या उच्च फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ५.३४ इंच आकारमानाचा, एफडब्ल्यूव्हिजीए प्लस (४८० बाय ९६० पिक्सल्स) क्षमतेचा, फुल व्ह्यू या प्रकारातील आणि १८:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉड-कोअर स्प्रेडट्रम एससी ९८५० हा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डची सुविधा असल्यामुळे ते वाढविता येणार आहे.

इंटेक्स इन्फी ३३ या स्मार्टफोनच्या मागे आणि पुढील बाजूस प्रत्येकी ५ मेगापिक्सल्सचे कॅमेरे देण्यात आले असून दोन्हींमध्ये एलईडी फ्लॅशची सुविधा असणार आहे. याशिवाय, यामध्ये फेस ब्युटी, फेस क्युट, वॉटरमार्क, टाईमलॅप्स, नाईट मोड आदी विविध मोड देण्यात आलेले आहेत. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १३ तासांच्या टॉकटाईम इतका बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या प्रणालीवर चालणारा आहे. ब्लॅक, ब्ल्यू आणि शँपेन या तीन रंगांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स आहेत. यासोबत यामध्ये जी-सेन्सर, अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांना ५,०४९ रूपयात खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here