इंटेक्स कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी इंटेक्स अॅक्वा लायन्स टी १ लाईट व्हीआर हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
इंटेक्सने बाजारपेठेत इंटेक्स अॅक्वा लायन्स टी १ लाईट व्हीआर हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला आहे. हे मॉडेल स्टील ग्रे, रॉयल ब्लॅक आणि शँपेन या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये आणि ४,४९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.
इंटेक्स अॅक्वा लॉयन्स टी १ लाईट व्हीआर या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए (८५४ बाय ४८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम १ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यात २२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. या मॉडेलमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशसह ५ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे अनुक्रमे मुख्य व फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील मुख्य कॅमेर्यामध्ये ब्युटी मोड, पॅनोरामा मोड आणि बर्स्ट मोड देण्यात आले आहेत. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात मराठी आणि हिंदीसह एकूण २१ भारतीय भाषांचा सपोर्ट असणारी मातृभाषा प्रणाली देण्यात आली आहे. तर यात फोर-जी नेटवर्कसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस आदी सुविधा दिलेल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे यासोबत अतिशय दर्जेदार असा व्हीआर हेडसेट मिळणार आहे. याच्या मदतीने कुणीही व्हिडीओ, लाईव्ह स्ट्रीमिंग, गेम्स आदींचा व्हर्च्युअल रिअॅलिटी म्हणजे आभासी सत्यतेच्या स्वरूपातील आनंद घेऊ शकणार आहे.