ई-पोर्टर्ल्सवरून सवलतींचा वर्षाव

0

आजपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अमेझॉन इंडिया या ई-पोर्टल्सनी ग्राहकांवर घसघशीत सवलतींचा अक्षरश: वर्षाव केला आहे.

नवरात्रोत्सव ते दिवाळीपर्यंचा कालखंड हा भारतीय बाजारपेठेसाठी अत्यंत तेजीचा म्हणून ओळखला जातो. बहुतांश वाहने, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, कपडे, दागिने आदींची खरेदी याच कालखंडात होत असते. यामुळे या खास सणासुदीच्या दिवसांसाठी अगदी गल्लीबोळातील व्यापार्‍यापासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यादेखील खास नियोजन करत असतात. या अनुषंगाने सणानिमित्त ई-कॉमर्स कंपन्यांनीही दणदणीत ऑफर्सचा वर्षाव करणार्‍या योजना जाहीर केल्या आहेत.

फ्लिपकार्ट कंपनीचा गेल्या वर्षीचा ‘बिग बिलीयन डे’ खूप गाजला होता. यात ग्राहकांना खूप मनस्ताप झाला. बर्‍याच जणांनी फसवणुकीची तक्रार केली तरी फ्लिपकार्टसाठी हा दिवस प्रचंड लाभदायी ठरला होता. आता नवरात्रोत्सवात फ्लिपकार्टने आजपासून तब्बल पाच दिवस ‘बिग बिलीयन डेज’ साजरा करण्याचे ठरविले आहे. अर्थात गेल्या वेळेच्या विपरीत यावेळी फ्लिपकार्टने फक्त आपल्या ऍपच्या वापरकर्त्यांनाच सवलती दिल्या आहेत. अर्थात वेबसाईटवरून आपल्याला सवलती दिसत असल्या तरी त्या फक्त ऍपच्या वापरकर्त्यांना मिळणार आहेत. आज सकाळपासून फ्लिपकार्टच्या ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव करण्यात येत आहे.

फ्लिपकार्टप्रमाणे अमेझॉन इंडियानेही आजपासूनच पाच दिवस घसघशीत सवलती जाहीर केल्या आहेत. अर्थात फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडियामध्ये सरळ लढत आहे. यात स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, विविध गॅजेटस्, पुस्तके आदींसह वेगवेगळ्या वर्गवारी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. इकडे स्नॅपडीलने कोणतीही घोषणा न करता आजपासून थेट विविध वस्तूंवर डिस्काऊंट देऊन या दोन्ही कंपन्यांशी स्पर्धा सुरू केली आहे. म्हणजे फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया आणि स्नॅपडील या तिन्ही कंपन्यांमध्ये येत्या काही दिवसांत वर्चस्वाची तुंबळ लढाई होणार आहे. यात अर्थातच सवलतींचा वर्षाव होत असल्याने ग्राहकराजा खुश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here