जोला स्मार्टफोन आता भारतात

0

फिनलँडमधील स्मार्टफोन विक्रीत अग्रेसर असणार्‍या जोला या कंपनीने भारतात पदार्पण करत असल्याची घोषणा केली आहे.

jolla

फिनलँडचे नाव येताच आपल्यासमोर नोकियाचे नाव येते. एके काळी मोबाईल फोनच्या निर्मितीत आघाडीवर असणार्‍या या कंपनीने स्मार्टफोन निर्मितीकडे केलेले दुर्लक्ष त्यांना महागात पडले. ऍपल, ब्लॅकबेरी, सॅमसंग आदी कंपन्यांनी स्मार्टफोन निर्मीतीत मुसंडी मारून नोकियाला अक्षरश: चीत केले. यामुळे ही कंपनी दिवाळखोरीत निघून अखेर मायक्रोसॉफ्टने अधिग्रहीत केली आहे. या सर्व घटनांना उजाळा देण्याचे एकच कारण म्हणजे येथे कार्यरत असणार्‍या सामी पियेनीमस्की यांनी आपल्या सहकार्‍यांसह स्थापन केलेल्या ‘जोला’ या कंपनीने आपले स्मार्टफोन आता भारतातील ग्राहकांसाठी सादर केले आहेत.

‘जोला’ कंपनीने यासाठी ‘स्नॅपडील’ या ऑनलाईन शॉपीशी करार केलेला आहे. याचा अर्थ आपण जोला कंपनीचे मोबाईल फक्त याच पोर्टलवरून खरेदी करू शकणार आहोत. यातील पहिल्या फोनची फिचर्स उत्तम आहेत. ४.५ इंच हाय डेफिनेशन स्क्रीन असणारा हा फोन १.४ गेगाहर्टझ क्वालकोम स्नॅपड्रॅगन ऑपरेटींग सिस्टिमवर चालतो. याची रॅम १ जीबी असून १६ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले असून ते मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येणे शक्य आहे. यात मागील बाजूस ८ तर समोरून दोन मेगापिक्सल क्षमतेचे कॅमेरे देण्यात आले आहेत. यात वायफाय, थ्री-जी, ब्लूटुथ आदी कनेक्टीव्हिटीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. युरोपात हा फोन ३४९ युरो इतक्या किंमतीत विकला जात आहे. भारतीय रूपयात हे मुल्य सुमारे २८ हजारांपेक्षा जास्त जाते. जोला नेमका किती किमतीत हा स्मार्टफोन उपलब्ध करणार याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र युरोपातील किंमत भारतात लागू केल्यास ग्राहकांची याला पसंती मिळणे मुश्कील दिसत आहे.

‘जोला’चा हा स्मार्टफोन ‘सेलफिश’ या ऑपरेटींग सिस्टिमवर चालतो. ही सिस्टिम ‘मीगो’ या सॉफ्टवेअरमधून विकसित करण्यात आली असून ती नोकियाच्या फोनमध्ये वापरण्यात येत होती. ‘सेलफिश’ ही सिस्टिम अँड्रॉईडशी सुसंगत असून ती अन्य उपकरणांवरही वापरता येते. यामुळे ती लवचिक आणि उपयुक्त असल्याचा दावा ‘जोला’ कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here