सॅमसंग या कंपनीने आपल्या टायझेन या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा झेड थ्री हा दुसरा स्मार्टफोन भारतात ८,४९० रूपयांना सादर केला आहे.
सॅमसंग कंपनीचा झेड थ्री हा स्मार्टफोन ‘मेक इन इंडिया’ अर्थात भारतात उत्पादीत करण्यात आला आहे. टायझेन प्रणाली भारतात हळूहळू लोकप्रिय होत आहे. आधी देशात झेड वन हे मॉडेल लॉंच करण्यात आले होते. याला ग्राहकांची पसंती मिळाली होती. यामुळे उत्साह दुणावलेल्या सॅमसंगने झेड थ्री लॉंच केला आहे.
झेड थ्री हा स्मार्टफोन पाच इंच आकाराच्या एचडी सुपर अमोलेड डिस्प्लेने सज्ज आहे. तो १.३ गेगाहर्टझ क्वाड-कोअर स्प्रेडट्रम एससी ७७३०एस एसओसी प्रोसेसरवर चालणारा आहे. याची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. एलईडी फ्लॅशसह यात आठ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा तर सेल्फीसाठी पाच मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा दिलेला आहे. सॅमसंग झेड थ्री या मॉडेलमध्ये २६०० मिलीअँपीअर क्षमतेची बॅटरी आहे. यात थ्री-जी, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस आदी पर्यायदेखील देण्यात आले आहेत. यावर माय गॅलेक्सी ऍप प्रिलोडेड अवस्थेत येणार आहे.