देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असणार्या फ्लिपकार्टमध्ये पाच संस्थांनी तब्बल ७० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. याचसोबत फ्लिपकार्टने सिंगापुरात आपली कंपनी ‘पब्लिक लिमिटेड’ करण्याची प्रक्रियादेखील सुरू केली आहे.
प्रचंड गतीने प्रगतीपथावरून गतीक्रमण करणार्या फ्लिपकार्टमध्ये आजवर डीएसटी ग्लोबल, जीआयसी, आयकॉनिक कॅपिटल आणि टायगर ग्लोबल या गुंतवणुकदार संस्थांनी भांडवलांची गुंतवणूक केली होती. दरम्यान, फ्लिपकार्टमध्ये आज बेली गिफोर्ड, ग्रीनओक्स कॅपिटल, स्टेडीव्ह्यू कॅपिटल, टी. रोवे प्रिन्स असोसिएटस आणि कतार इनव्हेस्टमेंट ऑथॅरिटी या फर्म्सची तब्बल ७० कोटी डॉलर्सची ( सुमारे ४४३३ कोटी रूपये ) गुंतवणूक करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, फ्लिपकार्ट कार्पोरेशनची नोंदणी सिंगापुरात झालेली आहे. आता फ्लिपकार्टमधील गुंतवणुकदारांची संख्या पन्नासच्या वर गेली असल्याने तेथील नियमानुसार ही कंपनी ‘पब्लिक लिमिटेड’ होणार आहे. अर्थात नजीकच्या काळात तरी ‘आयपीओ’चा कोणताही विचार नसल्याचे फ्लिपकार्टतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यावर्षाच्या ऑक्टोबर महिन्यातच स्नॅपडील या अन्य भारतीय ई-कॉमर्स कंपनीने ६२.८ कोटी डॉलर्सचे भांडवल उभे केले होते. याच मार्गावर जात फ्लिपकार्टनेही हे भांडवल जमा केल्याने आगामी काळात भारतीय बाजारपेठेत ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.