फ्लिपकार्ट या देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीने ‘मेक माय ट्रिप’ या पोर्टलसोबत करार करून विविध तिकिटांच्या विक्रीत पदार्पण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
फ्लिपकार्ट या कंपनीच्या पोर्टलवर लवकरच ‘तिकिट प्लॅटफॉर्म’ सादर करण्यात येणार आहे. यावर मेक माय ट्रिप या पोर्टलच्या मदतीने कुणीही रेल्वे व हवाई प्रवासाची तिकिटे खरेदी करू शकतो. भारतात पर्यटन व्यवसाय प्रचंड गतीने वाढत आहे. या पार्श्वभुमिवर फ्लिपकार्ट कंपनीने उचलेले हे पाऊल लाभदायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या वर्षाच्या मार्च महिन्यातच ‘अमेझॉन इंडिया’ने रेल्वेची तिकिटे अधिकृत विकणार्या ‘आयआरसीटीसी’ सोबत दोन वर्षांसाठी करार केला आहे. यामुळे याच्याच पावलावर पाऊल ठेवत फ्लिपकार्ट आणि मेक माय ट्रिप हे दोन पोर्टलही सोबत येणार आहेत. फ्लिपकार्ट कंपनीच्या सुत्रांनी या माहितीला दुजोरा दिला असला तरी ही सुविधा नेमकी केव्हा लागू होणार याबद्दल माहिती दिली नाही. अर्थात सप्टेंबर महिन्यात हा तिकिट प्लॅटफॉर्म सुरू होणार असल्याचे मानले जात आहे. सप्टेंबर महिन्यापासूनच फ्लिपकार्ट आपली वेबसाईट बंद करून फक्त मोबाईल ऍप्लीकेशनच्या माध्यमातून व्यवसाय करणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. यामुळे तिकिट प्लॅटफॉर्मही फ्लिपकार्टच्या ऍपवरच अवतीर्ण होणार आहे.