अडोब कंपनीने आपल्या फ्लॅश सॉफ्टवेअरला समाप्त करण्याची तारीख घोषीत करावी अशी मागणी फेसबुकचे सिक्युरिटी चीफ अलेक्स स्टामोस यांनी केली आहे. या माध्यमातून त्यांनी एका महत्वाच्या विषयाला हात घातले आहे.
अडोब कंपनीचे फ्लॅश सॉफ्टवेअर हे बहुतांश सर्व डिजीटल उपकरणांचा आत्मा आहे. याचसोबत कोट्यवधी वेबसाईटमध्ये फ्लॅश उपयोगात आणले जाते. ऍनिमेशन, गेमिंग आणि व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी फ्लॅश अत्यंत उपयुक्त आहे. जगभरात तब्बल ५० कोटी उपकरणे तर सुमारे साडेअकरा कोटी वेबसाईटचा फ्लॅश अविभाज्य घटक आहे. या पार्श्वभुमिवर फेसबुकचे सिक्युरिटी चीफ अलेक्स स्टामोस यांनी ट्विट करून फ्लॅश सॉफ्टवेअरच्या गुणवत्तेला आव्हान दिले आहे. त्यांनी तर थेट अडोब कंपनीने आपले हे सॉफ्टवेअर आता मागे घ्यावे, यासाठी तारीख जाहीर करावी अशी मागणीदेखील केली आहे.
फ्लॅश सॉफ्टवेअर हे अत्यंत उपयुक्त असले तरी सुरक्षेच्यादृष्टीने यात भयंकर त्रुटी असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. गेल्या आठवड्यातच काही हॅकर्सनी इटालीयन सरकारचा ४०० जीबी हॅक करून याचे विवरण जाहीर केले. यात फ्लॅश सॉफ्टवेअर्समधील त्रुटींचा उपयोग करून जगभरातील विविध गुप्तहेर संघटना बिनदिक्कतपणे माहिती जोरत असल्याची बाब समोर आली होती. यानंतर अलेक्स स्टामोस यांनी तर थेट फ्लॅश मागे घेण्याची मागणी केली आहे. २०१० साली स्टीव्ह जॉब्ज यांनी खुले पत्र लिहून फ्लॅश सॉफ्टवेअरच्या त्रुटींवर बोट ठेवले होते. त्यांनी ऍपलच्या उत्पादनांमधून फ्लॅश हद्दपारही केले होते. आता अलेक्स यांनी हीच मागणी पुढे रेटली आहे. मुळातच ‘एचटीएमएल५’मुळे फ्लॅशपेक्षाही उत्तम प्रतिचे ऍनिमेशन व व्हिडीओ स्ट्रीमिंग होते. यासोबत सुरक्षेच्यादृष्टीने ते अत्यंत परिणामकारक आहे. यामुळे फ्लॅश हे मरणपंथाला लागले असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. अलेक्स यांच्या मागणीवर अद्याप अडोब कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.