ब्लॅकबेरीने भारतात डीटीईके ५० आणि डीटीईके ६० हे दोन अँड्रॉईड प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत.
ब्लॅकबेरी डीटीईके ५० आणि ब्लॅकबेरी डीटीईके ६० हे स्मार्टफोन काही देशांमध्ये आधीच लाँच करण्यात आले असून ते आता भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील ब्लॅकबेरी डीटीईके ५० या मॉडेलमध्ये ओलिओफोबिक कोटींगसह ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टिबीपर्यंत वाढविणे शक्य असेल. यात २६१० मिलीअँपिअरची बॅटरी तर १३ व ८ मेगापिक्सल्सचे कॅमेरे असतील.
ब्लॅकबेरी डीटीईके ६० या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि २५६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा म्हणजेच ‘क्युएचडी’ डिस्प्ले असेल. याची रॅम चार जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टिबीपर्यंत वाढविणे शक्य असेल. यात फिंगरप्रिंट स्कॅनरही प्रदान करण्यात आले आहे. अर्थात हे फिचर असणारा हा ब्लॅकबेरी कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. यातील कॅमेरे हे २१ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे तर बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे असून यात ब्लॅकबेरीचे सुरक्षाविषयक विविध फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. ब्लॅकबेरी डीटीईके ५० हे मॉडेल २१,९९० तर ब्लॅकबेरी डीटीईके ६० हा स्मार्टफोन ४६,९९० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येईल. ‘ऑप्टीमस डिस्ट्रीब्युशन नेटवर्क’च्या माध्यमातून भारतात हे मॉडेल लवकरच मिळणार असल्याचे ब्लॅकबेरी कंपनीने स्पष्ट केले आहे.