भारतीय स्मार्टफोन उत्पादकांसमोर अस्तित्वाचे आव्हान

0
Micromax-to-launch-affordable-Bharat-series-with-4G-VoLTE-capability

शाओमीसह अन्य चीनी कंपन्यांच्या जोरदार मुसंडीमुळे मायक्रोमॅक्ससह इतर भारतीय स्मार्टफोन उत्पादकांसमोर अस्तित्वाचे आव्हान उभे राहिल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

भारतीय बाजारपेठेत गत तिमाहीमध्ये विकल्या गेलेल्या स्मार्टफोनच्या आकडेवारीवरून सीएमआर या रिसर्च संस्थेने एक सविस्तर अहवाल सादर केला आहे. यात भारतीय कंपन्यांसमोर आता अस्तित्वाचेच आव्हान उभे राहिले असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. प्रारंभी चीनी कंपन्यांच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी मायक्रोमॅक्स, लाव्हा, इंटेक्स आदी भारतीय स्मार्टफोन उत्पादकांनी किफायतशीर दरातील मॉडेल्सवर लक्ष केंद्रीत केले. तथापि, चीनी कंपन्यांनीही हाच मार्ग निवडत अल्प मूल्यात उत्तमोत्तम हँडसेट भारतीय ग्राहकांना सादर केले. यामुळे देशी कंपन्या मागे फेकल्या गेल्या. आज सॅमसंगच्या पाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर शाओमी ही चीनी कंपनी विराजमान झालेली आहे. विशेष म्हणजे शाओमी लवकरच भारतात पहिल्या क्रमांकाची कंपनी बनणार असल्याचे संकेत आता दिसून येत आहेत. याशिवाय, विवो, ओप्पो, हुआवे आणि याचीच मालकी असणारा ऑनर आदी ब्रँडनी आपली बाजारपेठ काबीज केली आहे.

भारतातील कंपन्यांसमोर ग्राहकांची बदललेली आवड हा सर्वात मोठा अडसर असल्याचे सीएमआरच्या अहवालात म्हटले आहे. बहुतांश भारतीय युजर्स हे आपला जुना स्मार्टफोन बदलून नवीन घेत असल्याचे दिसून आले आहे. गत वर्षाचा विचार केला असता, तब्बल ५९ टक्के स्मार्टफोन युजर्सनी नवीन मॉडेल विकत घेतले. यात साहजीकच चीनी कंपन्यांना प्राधान्य देण्यात आले. यामुळे एकीकडे हँडसेटची विक्री कमी होत असतांनाच दुसरीकडे आधी विकल्या गेलेल्या मॉडेल्सचाही ग्राहक त्याग करत आहेत. यामुळे एकाच वेळी दोन आव्हानांना तोंड देण्याची जबाबदारी भारतातील स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांवर आलेली आहे. या आव्हानाला पेलणे फारसे सोपे नसल्याचे प्रतिबिंब ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. कधी काळी मायक्रोमॅक्स ही कंपनी देशातील पहिल्या पाचमध्ये होती. आता ही कंपनी प्रचंड पीछाडीवर गेलेली आहे. याच प्रकारे इंटेक्स, लाव्हा, कार्बन आदी कंपन्यांनाही याचा फटका बसला आहे. दरम्यान, याच प्रकारे एचटीसी, जिओनी आदी विदेशी कंपन्यांनाही याच प्रकारच्या आव्हानांमुळे जेरीस आल्याचे या अहवालात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here