वन प्लस कंपनीने किफायतशीर मुल्यात अत्यंत उच्च श्रेणीचे फिचर्स असणारा वन प्लस एक्स हा स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले आहेत.
वन प्लस टू हा स्मार्टफोन सादर केल्यानंतर आता ही कंपनी तुलनेत थोड्या कमी मुल्यात ग्राहकांना चांगली फिचर्स देणार असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने ‘गिझ्मो चायना’ या टेक पोर्टलने ही कंपनी वन प्लस एक्स या नावाने नवीन मॉडेल सादर करणार असल्याचे वृत्त दिले आहे. वन प्लस एक्स या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा एचडी डिस्प्ले राहण्याची शक्यता आहे.
यात वन प्लस हा मॉडेलचे बहुतांश फिचर्स राहण्याची शक्यता आहे. मात्र याचसोबत यात ड्युअल रिअर कॅमेरा असू शकतो. याचसोबत यात फिंगरप्रिंट स्कॅनर, युएसबी सी पोर्ट आदी फिचर्स असू शकतात. ‘गिझ्मो चायना’च्या वृत्तानुसार वन प्लस एक्स हे मॉडेल २४९ डॉलर्स अर्थात सुमारे १६,५०० रूपयांमध्ये लॉंच करण्यात येणार आहे. साधारणत: ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस वन प्लस एक्स चीनमध्ये लॉंच करण्यात येईल असे मानले जात आहे. इकडे भारतातही लागलीच दिवाळीच्या काळात वन प्लस एक्स येण्याची शक्यता आहे.