रिलायन्स जिओ या कंपनीने अवघ्या चार हजारात फोर-जी स्मार्टफोन लॉंच करण्याची घोषणा केली आहे. याचसोबत किफायतशीर दरात डाटा पॅकेजही ही कंपनी देणार आहे.
देशात फोर-जी युगाची चाहूल लागण्याची चिन्हे असतांनाच याचा लाभ घेण्यासाठी मुकेश अंबानी यांची ‘रिलायन्स जिओ’ आणि अनिल अंबानी यांची ‘रिलायन्स कम्युनिकेशन’ या दोन्ही कंपन्यांनी सहकार्याचा करार केला आहे. काही दिवसांपुर्वीच रिलायन्स अत्यंत किफायतशीर मुल्यात फोर-जी हँडसेट सादर करणार असल्याचे वृत्त ‘टेकवार्ता’ने दिले होते. आता रिलायन्सने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
दोन्ही रिलायन्स कंपन्यांकडे देशातील तब्बल अडीच लाख किलोमीटर इतके अजस्त्र फोर-जी साठी आवश्यक असणारे ऑप्टीक फायबरचे जाळे आहे. यामुळे ग्राहकांना उत्तम गतीने फोर-जी नेटवर्क सेवा देता येणार आहे. मात्र केवळ यावर समाधान न मानता रिलायन्सने हार्डवेअर अर्थात फोर-जी कनेक्टिव्हिटी असणारा अत्यंत किफायतशीर मुल्यात हँडसेट सादर करण्याचे ठरविले आहे. यानुसार अवघ्या चार हजार रूपयांमध्ये ‘एलवायएफ’ या नावाने फोर-जी स्मार्टफोन मिळणार आहे. यातील फिचर्स अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी ते उत्तम प्रतिचे असण्याची शक्यता आहे. याचसोबत रिलायन्स कंपनी आपल्या ग्राहकांना ३०० ते ५०० रूपये प्रतिमहा या किफायतशीर दराने उत्तम गतीचे फोर-ची इंटरनेट देणार आहे.
देशात मोबाईल युगाची सुरूवात होत असतांना रिलायन्सने अवघ्या पाचशे रूपयात हँडसेट देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला होता. आता फोर-जी युग सुरू होत असतांनाही रिलायन्स कंपनी नेटवर्क आणि हार्डवेअर या दोन्ही क्षेत्रावर पकड मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे यातून दिसून आले आहे. या अंतर्गत चार हजारात फोर-जी स्मार्टफोन देण्यात येणार असला तरी अन्य उच्च फिचर्स असणारे अन्य स्मार्टफोनही बाजारात येणार आहेत. रिलायन्सने यासाठी पाच कंपन्यांशी बोलणीसुध्द केली आहे. या सर्व प्रकल्पासाठी कंपनीने तब्बल ९३,००० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.