शाओमीच्या रेडमी ५ ए मॉडेलची मुसंडी

0

शाओमीचा रेडमी ५ ए हा स्मार्टफोन तुफान लोकप्रिय झाला असून जागतिक बाजापेठेत या मॉडेलने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

शाओमी ही चीनी कंपनी अत्यंत किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणार्‍या मॉडेल्समुळे ख्यात आहे. चीन, भारत तसेच अन्य राष्ट्रांमध्ये या कंपनीला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. अलीकडच्या काळात यासोबत शाओमीने मध्यम व उच्च श्रेणीतील स्मार्टफोनही सादर केले आहेत. यामुळे शाओमीची जोरदार घोडदौड सुरू आहे. यातच या कंपनीने अलीकडेच लाँच केलेल्या रेडमी ५ ए या मॉडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. यामुळे हे मॉडेल गत तिमाहीत जगात सर्वाधीक विकल्या जाणार्‍या स्मार्टफोनच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर विराजमान झाले आहे.
काऊंटरपॉईंट या संस्थेने जानेवारी ते मार्च २०१८ या कालखंडात जगभरात विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्सच्या आकडेवारीवरून निष्कर्ष काढणारा अहवाल नुकताच सादर केला आहे. यात पहिल्या दोन क्रमांकावर अ‍ॅपल कंपनीने कब्जा मिळवला आहे. या कंपनीचे आयफोन एक्स आणि आयफोन ८ प्लस या मॉडेल्सने अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळवतांना ३.५ व २.३ टक्के बाजारपेठेचा वाटा प्राप्त केला आहे. हे दोन्ही मॉडेल्स उच्च श्रेणीतील असून याला जगभरात अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर शाओमी कंपनीने मुसंडी मारली आहे. या कंपनीचा रेडमी ५ ए हा स्मार्टफोन तिसर्‍या क्रमांकावर विराजमान झाला आहे. विशेष बाब म्हणजे शाओमीने पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये स्थान मिळवले आहे. हे मॉडेल अतिशय किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारे असल्यामुळे याला ग्राहकांची पसंती मिळाल्याचे मानले जात आहे. चौथ्या क्रमांकावर ओप्पो ए ८३ हे मॉडेल आहे. तर पाचव्या व सहाव्या क्रमांकावर सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस९ प्लस हे मॉडेल आहे. या दोन्ही मॉडेलच्या मदतीनेच सॅमसंगने स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील आपले वर्चस्व कायम राखले आहे. सातव्या आणि आठव्या क्रमांकावर अ‍ॅपलचे आयफोन ७ आणि आयफोन ८ हे मॉडेल आहेत. नवव्या क्रमांकावर सॅमसंगचा गॅलेक्सी जे ७ प्रो तर दहाव्या क्रमांकावर अ‍ॅपलचा आयफोन ६ हे मॉडेल विराजमान झाल्याचे या यादीतून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शाओमीने एंट्री लेव्हल आणि मिड-रेंज या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. यातच शाओमीने याला अतिशय आक्रमक मार्केटींगची जोड दिली आहे. यामुळे आगामी काळात शाओमीचा झंझावात कायम राहण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here