शाओमी रेडमी ६ प्रो स्मार्टफोनचे अनावरण

0
xiaomi-redmi-6-pro,शाओमी रेडमी ६ प्रो,

शाओमी कंपनीने आपल्या रेडमी मालिकेतील रेडमी ६ प्रो या स्मार्टफोनला बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे एका शानदार कार्यक्रमात अनावरण केले आहे.

शाओमी कंपनीच्या रेडमी या मालिकेतील बहुतांश मॉडेल्स हे अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. यात आता रेडमी ६ प्रो या मॉडेलची भर पडणार आहे. शाओमी कंपनीने आजवर किफायतशीर आणि मिड-रेंज या विभागावर जास्त लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. रेडमी ६ प्रो हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. याचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज; ३ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज असे तीन व्हेरियंट बाजारपेठेत सादर करण्यात आले आहेत. यांचे भारतीय चलनानुसार मूल्य १० ते १३ हजारांच्या दरम्यान ठेवण्यात आले आहे. पहिल्यांदा हे तिन्ही व्हेरियंट चीनमध्ये मिळणार असून लवकरच यांना भारतात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

शाओमी रेडमी ६ प्रो या मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये १२ मेगापिक्सल्सचा प्राथमिक कॅमेरा असून यात एफ/२.२ अपर्चर, पीडीएएफ आणि एलईडी फ्लॅश लाईटची सुविधा आहे. तर यातील दुसरा कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असून यात एचडीआर आणि एआय पोर्ट्रेट मोड प्रदान करण्यात आला आहे. याच्याच मदतीने यात ‘फेस अनलॉक’ हे फिचर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये मायक्रो-एसडी कार्डसाठी स्वतंत्र स्लॉट देण्यात आला आहे. यामुळे याचा ड्युअल सीमसह वापर करता येणार आहे.

शाओमी रेडमी ६ प्रो या मॉडेलमध्ये ५.८४ इंच आकारमानाचा, १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचे डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६२५ हा प्रोसेसर दिलेला आहे. तर यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. याचा लूक अतिशय आकर्षक असून यामध्ये आयफोन-एक्स या मॉडेलप्रमाणे वरील बाजूस नॉच प्रदान करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here