जगभरात स्वस्त स्मार्टफोनच्या निर्मितीसाठी गुगलने ‘अँड्रॉईड वन’ ही प्रणाली विकसित केली असून याचे सर्वप्रथम पार्टनर म्हणून भारतातील स्पाईस, कार्बन आणि मायक्रोमॅक्स या कंपन्यांना निवडण्यात आले आहे.
सानफ्रान्सिस्को येथे सुरू असणार्या गुगल आय/ओ परिषदेत अँड्रॉइड व क्रोम ऑपरेटींग सिस्टिम विभागाचे प्रमुख सुंदर पिछाई यांनी उदघाटनपर सत्रात अँड्रॉईडच्या भवितव्याचे अत्यंत सखोल आणि सुरेख सादरीकरण केले. यात त्यांनी भविष्यात प्रत्येक यांत्रिक उपकरण हे अँड्रॉईडच्या मदतीने एकमेकांशी कनेक्ट राहील याचे सुतोवाच केले. याचसोबत स्वस्त आणि उत्तम दर्जाचे स्मार्टफोन तयार करण्यासाठी ‘अँड्रॉईड वन’ ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या प्रणालीची घोषणादेखील केली. विशेष बाब म्हणजे जगात सर्वप्रथम हा प्रणालीचे पार्टनर म्हणून भारतातील स्पाईस, कार्बन आणि मायक्रोमॅक्स या कंपन्यांना निवडण्यात आले आहे.
याचा वापर करून भारतात सर्वप्रथम मायक्रोमॅक्स ही कंपनी या वर्षाअखेरीस स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहे. यात साडेचार इंच डिस्प्ले, ड्युअल सीमकार्ड, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट व एफएम रेडिओची सुविधा देण्यात येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याची किंमत सुमारे सहा हजार रूपयांच्या आसपास राहणार आहे. याचाच अर्थ असा की, ‘अँड्रॉईड वन’चा वापर करून एंट्रील लेव्हलच्या मुल्यात उत्तम दर्जाचे स्मार्टफोन लवकरच बाजारपेठेत अवतरणार आहेत.