गुगलने प्रयत्नांची शर्थ केली तरी स्मार्ट स्पीकरच्या बाजारपेठेत अमेझॉनच नंबर वन असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
ध्वनी आज्ञावली अर्थात व्हाईस कमांडवर चालणारे डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहेत. स्मार्टफोनमध्ये याचा विपुल प्रमाणात वापर होत आहे. गुगल असिस्टंट, अमेझॉनचा अलेक्झा, अॅपलचा सिरी, सॅमसंगचा बिक्सबी आदी असिस्टंट सध्या वापरले जात आहेत. अर्थात, यात खरी स्पर्धा आहे ती गुगल असिस्टंट आणि अमेझॉनच्या अलेक्झा यांच्यातच ! जगभरात या दोन्ही असिस्टंटचे वापरकर्ते विपुल प्रमाणात आहेत. यात अलीकडच्या काळात स्मार्ट स्पीकरमध्ये या असिस्टंटचे अनेक फंक्शन्स युजर्सच्या पसंतीस उतरले आहेत. गुगलने होम मालिकेत तर अमेझॉनने इको मालिकेत स्मार्ट स्पीकर्स सादर केलेले आहेत. दोन्ही कंपन्यांनी एकमेकांना टक्कर देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली आहे. या पार्श्वभूमिवर, स्मार्ट स्पीकरच्या बाजारपेठेत अमेझॉनचा वाटा तब्बल ६१ टक्के असून गुगलकडे २९ टक्के वाटा असल्याचे ई-मार्केटर या संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या अहवालातून अधोरेखीत झाले.
स्मार्ट स्पीकरच्या बाजारपेठेत अमेझॉनने पहिल्यांदा प्रवेश केल्याचा लाभ त्यांना आजवर झालेला असला तरी गुगलने नंतर येऊ जोरदार मुसंडी मारली होती. तथापि, अद्याप तरी अमेझॉनच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या स्थितीत गुगल नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.