फेसबुकचे टिकटॉकला आव्हान : एकत्रीतपणे म्युझिक व्हिडीओ तयार करणारे अ‍ॅप लाँच

0

फेसबुकने टिकटॉकप्रमाणे शॉर्ट व्हिडीओ तयार करून ते शेअर करण्याची सुविधा असणारे कोलॅब हे अ‍ॅप बीटा म्हणजेच प्रयोगात्मक अवस्थेत सादर केले आहे.

सध्या टिकटॉक हे अ‍ॅप वादाच्या भोवर्‍यात सापडले असले तरी त्याची लोकप्रियता अबाधीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे टिकटॉकला टक्कर देण्याचा प्रयत्न इतर कंपन्या देखील करत आहेत. याबाबत अनेक कंपन्या करत असलेली चाचपणी आपण टेकवार्ताच्या माध्यमातून आधीच अनुभवली आहे. यात आता फेसबुकची भर पडल्याचे दिसून येत आहे. फेसबुकच्या न्यू प्रॉडक्ट एक्सपेरीमेंटेशन (एनपीई) या विभागाने आता कोलॅब हे नवीन अ‍ॅप सादर केले आहे. अद्याप याला फक्त आयओएस प्रणालीसाठी आणि ते देखील बीटा म्हणजे प्रयोगात्मक अवस्थेत सादर केले आहे. या संदर्भातील माहिती एका पोस्टच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे.
यानुसार कोलॅब अ‍ॅपमध्ये कुणीही तीन युजर हे एकत्रीतपणे म्युझिक व्हिडीओ तयार करू शकतील. यात ओरीजनल व्हिडीओत संगीत मिक्स करता येणार असून यासोबत स्वतंत्र संगीत तयार करण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. हा व्हिडीओ तयार झाल्यानंतर याला फेसबुक स्टोरी, इन्स्टाग्राम आदींसह अन्य सोशल मंचावर सहजपणे शेअर करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी नेमके कसे लॉगीन करावे लागेल याबाबतची माहिती अद्याप दिलेली नाही. तसेच हे अ‍ॅप अँड्रॉइड प्रणालीसह संगणकावरून वापरणार्‍यांना केव्हा उपलब्ध होईल याबाबतही एनपीईतर्फे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. तथापि, याला वापरण्यासाठी इच्छुक असणारे युजर्स https://npe.fb.com/collab या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करू शकतात. तर यासाठी https://www.facebook.com/groups/collab.beta हा फेसबुक ग्रुप देखील तयार करण्यात आला असून याला जॉईन होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here