फेसबुकने सीबीएसई संस्थेसोबत सहकार्याचा करार केला असून याच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजीटायझेशनसह एआर तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत.
कोरोनाच्या आपत्तीमुळे दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात ऑनलाईन शिक्षणालाही गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी विविध शाळा आणि खासगी कोचींग क्लासेस चालकांनी चाचपणी सुरू केली असतांनाच फेसबुकने केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसई सोबत सहकार्याचा करार केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबतची घोषणा केली आहे. यानुसार फेसबुक हे देशभरातील निवडक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजीटायझेशनचे धडे देणार आहेत. याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना डिजीटल वेल बीइंग आणि ऑनलाईन सेफ्टी याबाबत शिकवले जाणार आहे. तर शिक्षकांना विस्तारीत सत्यता (ऑग्युमेंटेड रिअॅलिटी) यांच्याबाबत माहिती देऊन फेसबुकच्या स्पार्क एआर स्टुडिओचा वापर शिकवला जाणार आहे. या दोन्ही प्रकारातील अभ्यासक्रम हा ऑनलाईन या प्रकारातील असून यासाठीची नोंदणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. ६ ऑगस्टपासून हे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू होणार असून ते पूर्ण करणार्याला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना इन्स्टाग्राम टुलकिटच्या मदतीने सुरक्षितपणे इंटरनेटचा वापर करण्याबाबत शिक्षण दिले जाणार आहे. तर शिक्षकांना ऑग्युमेंटेड रिअॅलिटीच्या प्राथमिक माहितीसह याचा शैक्षणीक वापर करण्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
फेसबुक फॉर एज्युकेशन मोहिमेच्या अंतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात १० हजार शिक्षक आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून दुसर्या टप्प्यात ही संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती सीबीएसईने दिली आहे.
या प्रशिक्षणासाठी इच्छुक खालील लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकतात.
१) शिक्षकांसाठी लिंक : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScWbxK4bg72G-6JT6IZ214K5QWk2nXWUiHSNeDtMtTF98FWJA/viewform
२) विद्यार्थ्यांसाठी लिंक : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf7Pm5mPK5Pji49nIBxGx7kpq7_G50On-p0y51lfDVHLRGoSg/viewform