व्यावसायिकांना लाभदायक ठरणार फेसबुक शॉप्स !

0

मार्क झुकरबर्गने आता जगभरातील लहान व्यावसायिकांना उपयुक्त ठरणार्‍या फेसबुक शॉप्सची घोषणा केली असून या माध्यमातून ऑनलाईन बिझनेस करणे सुलभ होणार आहे.

फेसबुकने आता फेसबुक शॉप्स या नावाने नवीन सेवा सुरू केली असून याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती जाहीर करण्यात आली आहे. यानुसार आता लहान-सहान व्यावसायिकांना ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी अतिशय सुलभ साधन उपलब्ध करण्यात आलेले आहे. फेसबुक शॉप्स हे नावातच नमूद असल्यानुसार ऑनलाईन शॉप असणार आहे. याला सेटअप करण्यासाठी फेसबुकच्या अकाऊंटशिवाय काहीही लागणार नाही. अर्थात, ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. खरं तर, फेसबुक पेजच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक आधीच ऑनलाईन व्यवसाय करत असले तरी फेसबुक शॉप्स हे यापेक्षा बरेच वेगळे आहे. एक तर यात अगदी प्रोफेशनल ई-कॉमर्स वेबसाईटप्रमाणे आपला डिजीटल प्रेझेन्स तयार करता येणार आहे. युजर यात आपल्या विविध प्रॉडक्टचा आकर्षक छायाचित्रांसह कॅटलॉग करू शकेल. यावर तो मूल्य देखील टाकू शकणार आहे. युजर यावर क्लिक करून संबंधीत प्रॉडक्ट खरेदी करण्याची व्यवस्था शॉप्समध्ये देण्यात आलेली आहे. यात ग्राहक संबंधीत प्रॉडक्टचे मूल्य अदा करू शकेल.

कोणत्याही दुकानाचा अविभाज्य घटक म्हणजे यातील मदतनीस होय. तर फेसबुक शॉप्समध्येही ग्राहकांच्या शंकांचे समाधान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यात व्हाटसअ‍ॅप, फेसबुक मॅसेंजर आणि इन्स्टाग्राम आदींच्या मॅसेजच्या माध्यमातून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात फेसबुक शॉप्सवरूनच खरेदी शक्य असली तरी लवकरच व्हाटसअ‍ॅप, मॅसेंजर आणि इन्स्टाग्रामवरही ही सुविधा मिळणार आहे. अर्थात, चारही डिजीटल मंचावर फेसबुक शॉप्स असेल हे स्पष्ट झाले आहे. तर लवकरच इन्स्टाग्रामवरही शॉप्स येणार आहे. यासाठी नेव्हिगेशन बारवर स्वतंत्र विभाग देण्यात येणार आहे. यात लाईव्ह व्हिडीओजमध्ये आपल्या प्रॉडक्टची लिंक टाकून ती ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. अर्थात, कुणीही युजर हा लाईव्ह व्हिडीओ पाहतांनाच संबंधीत प्रॉडक्ट खरेदी करू शकतो.

फेसबुक शॉप्स हे पहिल्यांदा अमेरिकेत उपलब्ध करण्यात आले असून लवकरच भारतासह जगातील अन्य देशांमध्ये याला उपलब्ध करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here