अँड्रॉइड १० आवृत्तीची घोषणा

0

गुगलने आपल्या अँड्रॉइडच्या क्यू या आगामी आवृत्तीची घोषणा केली असून याला अँड्रॉइड १० या नावाने ओळखले जाणार आहे.

गुगलची अँड्रॉइड ही स्मार्टफोनसाठी वापरण्यात येणारी प्रणाली जगभरात लोकप्रिय आहे. याच्या आजवर नऊ आवृत्त्या आहेत. यातील प्रत्येक आवृत्तीचे नाव हे इंग्रजीतील अल्फाबेटनुसार सुरू होणार्‍या मिष्ट पदार्थावरून ठेवण्यात आलेले आहे. यामुळे अँड्रॉइडच्या नवीन आवृत्तीचे नाव नेमके कोणत्या गोड पदार्थावरून असेल याबाबत मोठी उत्सुकता असते. सध्या अँड्रॉइडची नववी आवृत्ती वापरात असून याला पाय हे नाव आहे. यामुळे अँड्रॉइडची आगामी आवृत्ती क्यू या नावावरून असून यापासूनच सुरू होणार्‍या एखाद्या मिष्ट पदार्थाचे नाव असेल असे मानले जात होते. अनेकांनी तर याबाबत अंदाजदेखील व्यक्त केले होते. मात्र गुगलने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देत पहिल्यांदाच या आवृत्तीला कोणत्याही गोड पदार्थाचे नाव दिले नाही. तर ही आवृत्ती अँड्रॉइड १० या नावाने ओळखली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षीच्या गुगल आय/ओ परिषदेत या आवृत्तीचा पहिला प्रिव्ह्यू जाहीर करण्यात आला होता. यानंतर आता याला अधिकृतपणे नामकरण करून सादर करण्यात आले आहे.

गुगलने मिष्ट पदार्थांच्या नावाचा पॅटर्न कशामुळे सोडला याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. तथापि, जगभरातील भाषांमध्ये उच्चारांमध्ये मोठी तफावत असल्यामुळे हा मार्ग पत्करण्यात आल्याची माहिती गुगलच्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे. आता यापुढे याचनुसार अँड्रॉइडचे नामकरण होणार असल्याचेही यात नमूद केलेले आहे. तसेच, अँड्रॉइडचे बोधचिन्ह अर्थात लोगोदेखील बदलण्यात आलेला आहे. यात क्यू हे अक्षर दर्शविण्यात आले असून यात १० हा आकडा दिसत आहे. दरम्यान, अँड्रॉइड १० ही आवृत्ती सर्व युजर्ससाठी नेमकी केव्हा खुली करण्यात येणार याबद्दल काहीही सांगण्यात आले नसले तरी पहिल्यांदा गुगलच्या पिक्सेल फोनमध्ये याला उपलब्ध केले जाईल. यानंतर याला अन्य उच्च श्रेणीतील मॉडेल्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here