हुआवे कंपनीने वॉच जीटी २ ई हे स्मार्टवॉच भारतीय ग्राहकांना सादर केले असून यात जंबो बॅटरीसह अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.
भारतीय बाजारपेठेत वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांची लोकप्रियता वाढत आहे. या अनुषंगाने हुआवे या विख्यात चीनी कंपनीने वॉच जीटी २ ई हे स्मार्टवॉच भारतीय ग्राहकांना सादर केले आहे. याचे मूल्य ११९९० रूपये असून याची अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून विक्री पूर्व नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अगावू नोंदणी करणार्यांना एएम६१ हे इयरबडस् या वॉचसोबत मोफत देण्यात येणार असल्याची ऑफर ग्राहकांना सादर करण्यात आली आहे.
याचे १.२९ इंच आकारमानाचा आणि ४५४ बाय ४५४ पिक्सल्स क्षमतेचा वर्तुळाकार अमोलोड डिस्प्ले दिलेला आहे. यात किरीन ए१ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला असून यात ४ जीबी इतकी इनबिल्ट मेमरी देखील दिलेली आहे. यात अतिशय दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे १४ दिवसांचा बॅकअप मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ असल्यामुळे कुणीही याला पावसात अथवा स्विमींग करतांनाही वापरू शकणार आहे. यात १५ प्रोफेशनल वर्कआऊटचे मोड इनबिल्ट अवस्थेत दिलेले असून यामध्ये चालणे, धावणे, पायर्या चढणे, पोहणे, सायकलींग आदींचा समावेश आहे. यात हार्ट रेट मॉनिटरदेखील आहे. याच्या मदतीने हृदयाच्या ठोक्यांचे मापन हे अनियमितपणे झाल्यास युजरला याचा अलर्ट मिळण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात निद्रेचे मापन करण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. यात एसपीओ२ सेन्सरही दिलेले असून याच्या मदतीने रक्तातील ऑक्सीजनच्या प्रमाणाचे मापन करता येणार आहे. यात इनबिल्ट जीपीएस देखील असून अन्य फिचर्समध्ये अँबिअंट लाईट, गायरोस्कोप, अॅक्सलेरोमीटर आदींचा समावेश आहे.
हुआवे वॉच जीटी २ ई हे स्मार्टवॉच अॅपच्या मदतीने स्मार्टफोनला कनेक्ट करता येते. यामुळे स्मार्टफोनचे नोटिफिकेशन्स, एसएमएस आदींचा या स्मार्टवॉचच्या डिस्प्लेवर पाहण्याची सुविधा दिलेली आहे.