शाओमीने मी बँड ३ आय हा फिटनेस बँड भारतीय ग्राहकांना सादर केला असून यात दर्जेदार बॅटरीसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.
शाओमीचे फिटनेस बँड भारतीय बाजारपेठेत चांगलेच लोकप्रिय झालेले आहेत. गत वर्षी मी बँड ३ हे मॉडेल लाँच करण्यात आले होते. यानंतर अलीकडेच मी बँड ४ हे मॉडेलही सादर करण्यात आले आहे. यानंतर आता मी बँड ३ आय हा फिटनेस बँड ग्राहकांना सादर करण्यात आलेला आहे. यात अनेक सरस फिचर्स आहेत. यात अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी प्रदान करण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० दिवसांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात ०.७८ इंच आकारमानाचा आणि १२० बाय ८० पिक्सल्स क्षमतेचा मोनोक्रोम व्हाईट डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा फिटनेस बँड ब्ल्यु-टुथच्या मदतीने स्मार्टफोनला कनेक्ट करता येतो. हे मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे याला पोहतांनाही वापरणे शक्य आहे.
शाओमीच्या मी बँड ३ आय या मॉडेलमध्ये वॉकींग, रनींग, ट्रॅकींग आदींसारख्या अॅक्टीव्हिटीज ट्रॅक करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात निद्रेचे मापन करण्याची सुविधादेखील दिलेली आहे. या सर्व अॅक्टीव्हिटीज मी फिट अॅपच्या माध्यमातून ट्रॅक करण्याची सुविधा यात आहे. याशिवाय, यावर याच्याशी संलग्न असणार्या स्मार्टफोनमधील विविध नोटिफिकेशन्स पाहता येणार आहेत. या फिटनेस बँडचे मूल्य १२९९ रूपये असून ग्राहक याला मी.कॉम या संकेतस्थळावरून खरेदी करू शकतात.