मोटोरोलाने भारतीय ग्राहकांसाठी पॉप-अप सेल्फी कॅमेर्याने युक्त असणारा वन फ्युजन प्लस हा स्मार्टफोन लाँच केला असून यात जंबो बॅटरीसह अनेक सरस फिचर्स आहेत.
लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोलाने वन फ्युजन प्लस हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर केले आहे. सध्या याचे ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज असणारे व्हेरियंट १६,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. ट्विलाईट ब्ल्यू आणि मूनलाईट व्हाईट या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये २४ जूनपासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. वर नमूद केल्यानुसार यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे यात पॉप-अप या प्रकारातील सेल्फी कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. हा फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. तर याच्या मागील बाजूस चार कॅमेर्यांचा सेटअप दिलेला असून यातील प्रमुख कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा आहे. याला ८ मेगापिक्सल्सचा वाईड अँगल लेन्स, ५ मेगापिक्सल्सचा मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सल्सच्या डेप्थ सेन्सरची जोड दिलेली आहे. यातील दुसरे लक्षवेधी फिचर म्हणजे यात १५ वॅट फास्ट चार्जरसह तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, मोटोरोला वन फ्युजन प्लस या मॉडेलमध्ये ६.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३०० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला असून यावर एचडीआर १० चा सपोर्ट दिलेला आहे. तर यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७३० हा प्रोसेसर प्रदान करण्यात आलेला आहे. यावर गुगल असिस्टंटसाठी स्वतंत्र बटन दिलेले आहे.