अमेझॉनने आपल्या किंडल ओअॅसिस या ई-रीडरची नवीन अद्ययावत आवृत्ती भारतीय ग्राहकांना तीन व्हेरियंटच्या माध्यमातून सादर केली आहे.
अमेझॉनच्या किंडल या मालिकेतील ई-रीडर मॉडेल्स हे भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. या अनुषंगाने आता किंडल ओअॅसिस या मॉडेलची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली आहे. याला ८ जीबी स्टोअरेज ( मूल्य २१,९९९ रूपये); ३२ जीबी स्टोअरेज शँपेन गोल्ड ( मूल्य २४,९९९) आणि ३२ जीबी स्टोअरेज ग्रॅफाईट मॉडेल (मूल्य २८,९९९) अशा तीन व्हेरियंटच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून विक्रीपूर्व नोंदणी सुरू करण्यात आली असून ऑगस्ट महिन्यात हे उपकरण ग्राहकांना प्रत्यक्षात मिळणार आहे.
किंडल ओअॅसिस रीडरच्या या नवीन आवृत्तीमध्ये नवीन पिढीच्या ई-इंक या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ई-बुक्सची पान जलद गतीने पलटवता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात ७ इंच आकारमानाचा पेपरव्हाईट या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आलेला आहे. वर व्हाईट लाईट आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात अॅडजस्ट करण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या जोडीला यात अॅडाप्टीव्ह फ्रंट लाईट हे फिचर दिले असून याचा वापर करून युजर ब्राईटनेस अॅडजस्ट करू शकतो. तसेच युजर त्याला हव्या त्या आकारात फाँट अॅडजस्ट करू शकतो.
नवीन किंडल ओअॅसिस मॉडेलमध्ये वाय-फाय कनेक्टीव्हिटी दिलेली आहे. यात किंडल फॉर्मेटसह टिएक्सटी, पीडीएफ, एचटीएमएल, डॉक्स, जेपीईजी, जीआयएफ, पीएनजी, बीएमपी आदी फॉर्मेटचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.