व्हाटसअ‍ॅप राहणार जाहिरातमुक्त ?

0

व्हाटसअ‍ॅपच्या स्टेटसमध्ये जाहिराती येणार असल्याची माहिती समोर आली असतांना आता ताज्या घडामोडींचा विचार करता फेसबुकने हा विचार थंड बस्त्यात टाकल्याचे दिसून येत आहे.

फेसबुकने २०१४ साली व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरला तब्बल १९ अब्ज डॉलर्स खर्च करून खरेदी केले होते तेव्हा टेकविश्‍वात खळबळ उडाली होती. इतका रग्गड पैसा मोजून खरेदी केलेले व्हाटसअ‍ॅप हे उत्पन्न मिळवून देण्यास सक्षम आहे का ? हा प्रश्‍न तेव्हा विचारण्यात आला होता. यानंतर व्हाटसअ‍ॅपने जगभरातील लोकांना वेड लावले तरी उत्पन्नाचे स्त्रोत वाढत नव्हते. या पार्श्‍वभूमिवर, २०१८ मध्ये मार्क झुकरबर्गने व्हाटसअ‍ॅपच्या मॉनेटायझेशनचे मनसुबे जाहिर केले. यानंतर युजर्सच्या गोपनीयतेचा भंग होण्याची भिती व्यक्त करत व्हाटसअ‍ॅपचे दोन्ही संस्थापक जॉन कोअम आणि ब्रायन अ‍ॅक्शन यांनी कंपनीच्या संचालक मंडळातून काढता पाय घेतला. तर गत वर्षी फेसबुकच्या कॉन्फरन्समध्ये मार्क झुकरबर्गने व्हाटसअ‍ॅपवर जाहिराती येणार असल्याचे स्पष्टपणे सूतोवाच केल्यानंतर या प्रकाराला गती येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर काही युजर्सच्या माध्यमातून जाहिरातींची चाचपणीदेखील सुरू करण्यात आली होती. तथापि. आता झुकरबर्गने व्हाटसअ‍ॅपवरील जाहिरातींची योजना बाजूला ठेवल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात वॉल स्ट्रीट जर्नलने सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला आहे.

या वृत्तानुसार व्हाटसअ‍ॅपच्य सोर्स कोडमध्ये आधी टाकण्यात आलेला जाहिरातींचा कोड ताज्या आवृत्तीत डिलीट करण्यात आलेला आहे. यामुळे जाहिरातींचा विचार रद्द करण्यात आल्याची माहिती यात देण्यात आलेली आहे. व्हाटसअ‍ॅपवरील संदेश हे एंड-टू-एंड एनक्रिप्शनने सुरक्षित असतात. याच्या स्टेटसवर जाहिराती आल्यास युजर्सच्या गोपनीयतेचा भंग होऊन त्याची सुरक्षादेखील धोक्यात येऊ शकते. नेमक्या याच कारणामुळे झुकरबर्ग यांनी हा विचार स्थगित केल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या ऐवजी, व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेस या स्वतंत्र अ‍ॅपवरील व्यवसाय वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा या वृत्तात देण्यात आलेली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मोठे व लहान व्यावसायिक आपल्या ग्राहकांशी थेट संवाद साधू शकतात. या बाबींचा विचार करता, व्हाटसअ‍ॅपवर जाहिरातींऐवजी व्यावसायिकांना सेवा प्रदान करून त्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याबाबत व्हाटसअ‍ॅपतर्फे अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here