नोकियाचा तब्बल पाच कॅमेर्‍यांनी युक्त स्मार्टफोन

0

आपल्याला डबल वा ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप असणारा स्मार्टफोन माहित असेल. तथापि, नोकियाने तब्बल पाच कॅमेर्‍यांनी युक्त असणारे मॉडेल भारतात लाँच करून धमाल उडवून दिली आहे.

स्मार्टफोनमध्ये आधी मागे एक आणि पुढे एक असा कॅमेरा सेटअप असे. गत दोन-तीन वर्षांचा विचार केला असता, पहिल्यांदा डबल कॅमेरा सेटअप लोकप्रिय झाला. यानंतर काही मॉडेलच्या मागील बाजूस तीन कॅमेरे आले. यांच्या मदतीने अगदी सजीव भासणारे फोटो घेता येत असल्यामुळे बहु कॅमेर्‍यांनी युक्त असणारे स्मार्टफोन लोकप्रिय होऊ लागले आहेत. तर याचसोबत कंपन्यांनी कॅमेर्‍यांची संख्या वाढविण्याची स्पर्धा सुरू केली आहे. यात नोकियाने दोन वा तीन नव्हे तर मागील बाजूस तब्बल पाच कॅमेर्‍यांनी युक्त असणारा नोकिया ९ प्युअर व्ह्यू हा स्मार्टफोन लाँच करून आघाडी घेतली आहे.

नोकिया ९ प्युअर व्ह्यू या मॉडेलचे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये अनावरण करण्यात आले होते. आता हेच मॉडेल भारतीय ग्राहकांना ४९,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आले असून फ्लिपकार्ट व नोकिया स्टोअरवरून खरेदी करता येणार आहे. याच्या मागे असणारे पाचही कॅमेरे हे प्रत्येकी १२ मेगापिक्सल्स क्षमतेचे आहेत. यातील तीन मोनोक्रोम तर दोन आरजीबी या प्रकारातील आहेत. यामधील तीन कॅमेरे हे एका रेषेत देण्यात आले असून दोन कॅमेरे दोन भिन्न दिशांना दिलेले आहेत. या सर्व कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार अशा प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हा कॅमेरा एचडीआर आणि पोर्ट्रेट मोडमध्ये इमेज कॅप्चर करतो. तर एआय म्हणजे आर्टीफिशियल इंटिलेजीयन्सच्या मदतीने यात तब्बल १२०० डेप्थ लेअर्स ओळखू शकतो. यामुळे यातून घेतलेली प्रतिमा ही तुलनेत अधिक सजीव वाटणार आहे. दरम्यान, या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी २० मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे.

उर्वरित मॉडेल्सचा विचार केला असता, नोकिया ९ प्युअर व्ह्यू या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस रेझोल्युशनचा व पीओएलईडी या प्रकारातील डिस्प्ले दिलेला असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. हा स्मार्टफोन आयपी६७ मानांकीत असून तो वॉटर आणि डस्टप्रूफ असल्याने याचा रफ वापर करता येणार आहे. क्युआय या वायरलेस चार्जींगच्या तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ३,३२० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हा स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉइड वन या प्रोग्रॅमच्या अंतर्गत लाँच करण्यात आला असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here