अमेझॉनने आपल्या मुख्य अॅपमध्ये अलेक्झा या डिजीटल असिस्टंटच्या मदतीने शॉपींग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
अलेक्झा हा अमेझॉनने विकसित केलेला डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट जगभरात विपुल प्रमाणात वापरला जात आहे. कुणीही युजर याच्या माध्यमातून व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या माध्यमातून विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो. स्मार्टफोनसह स्मार्ट स्पीकर, स्मार्ट डिस्प्ले, स्मार्ट टिव्ही, स्मार्ट हेडफोन्स आदी उपकरणांमध्ये अलेक्झाचा वापर होत आहे. अमेझॉनने अलीकडच्या काळात अलेक्झाची व्याप्ती वाढविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. या अनुषंगाने कंपनीने आता आपल्या मुख्य अॅपमध्ये अलेक्झाला संलग्न केले आहे. अर्थात, आता या ‘स्पीक टू शॉप’ फिचरच्या मदतीने अमेझॉनच्या मुख्य शॉपींग अॅपमध्ये अलेक्झा वापरता येणार आहे.
अमेझॉनने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून अलेक्झाच्या या नवीन इंटिग्रेशनबाबत माहिती दिली आहे. यानुसार आता कुणीही युजर अमेझॉनच्या अॅपमध्ये व्हाईस कमांडचा वापर करून खरेदी करू शकतो. यात प्रॉडक्ट सर्च करण्यापासून ते पेमेंट अदा करण्यापर्यंचे सर्व फंक्शन्स हे अलेक्झाच्या मदतीने पार पाडता येणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. यासाठी युजरला आपल्या स्मार्टफोनच्या मायक्रोफोनचा वापर करण्याची परमीशन द्यावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात युजर फक्त इंग्रजीतून बोलून खरेदी करू शकणार आहे. अर्थात, लवकरच हिंदी व मराठीसह अन्य भारतीय भाषांचा सपोर्टदेखील प्रदान करण्यात येणार आहे.
भारतात अलेक्झाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. बहुतांश भारतीय भाषांमध्ये हा असिस्टंट उपलब्ध करण्यात आलेला आहे. आता याची उपयुक्तता वाढविण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे अधोरेखीत झालेले असून ‘स्पीक टू शॉप’ हे या दृष्टीने टाकलेले महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.