किफायतशीर रिअलमी सी३ लाँच : जंबो बॅटरीसह अनेक सरस फिचर्स

0

रिअलमीने आपला सी३ हा स्मार्टफोन आज भारतात लाँच केला असून यात जंबो बॅटरीसह अनेक उत्तम फिचर्सचा समावेश आहे.

ओप्पोची उपकंपनी असणार्‍या रिअलमीतर्फे आज रिअलमी सी३ हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले. खरं तर आधीच बाजारात असणारे सी२ हे मॉडेलदेखील खूप लोकप्रिय असून आता याचीच पुढील आवृत्ती रिअलमी सी३ च्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे. याला ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे ६,९९९ आणि ७,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. ब्लेझींग रेड आणि फ्रोझन ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये फ्लिपकार्टसह रिअलमी.कॉम या पोर्टलवरून याला खरेदी करता येणार आहे. याची ऑफलाईन विक्री ही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. यात रिव्हर्स चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही बॅटरी लागोपाठ सहा चित्रपट पाहण्यापर्यंत बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर रिव्हर्स चार्जींगच्या फिचरमुळे ही बॅटरी पॉवर बँक म्हणूनदेखील वापरणे शक्य आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, रिअलमी सी३ या मॉडेलमध्ये ६.५२ इंच आकारमानाचा आणि मिनी ड्रॉप या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले वॉटर ड्रॉप या प्रकारातील असून यावर लेटन्सी ऑप्टीमायझेशन करण्यात आले आहे. यामुळे यावर अतिशय दर्जेदार पध्दतीत व्हिडीओचा आनंद घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात अलीकडेच सादर करण्यात आलेला मीडियाटेकचा जी७० हा ऑक्टा-कोअर प्रोसेसर दिलेला आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यात १२ आणि २ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असून यात एआय ब्युटी कॅमेरा हे विशेष फिचर दिलेले आहे. रिअलमी सी३ हा स्मार्टफोन रिअलमी युजर इंटरफेसवर चालणारा आहे. हा इंटरफेस अँड्रॉइड १० या आवृत्तीवर आधारित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here