सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस६ लाँच : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

सॅमसंगने गॅलेक्सी टॅब एस६ हा टॅबलेट भारतीय ग्राहकांना सादर केला असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

सॅमसंग कंपनीने आधीच गॅलेक्सी टॅब एस६ सादर करण्याचे संकेत दिले होते. या अनुषंगाने हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. हे टु-इन-वन या प्रकारातील मॉडेल असल्याने याला टॅबलेटसह लॅपटॉप म्हणूनदेखील वापरता येणार आहे. यासोबत नवीन एस पेन हा स्टायलस पेनदेखील सादर करण्यात आला असून याच्या मदतीने रेखाटन करण्यासह नोटस् घेता येणार आहेत. यात ०.३५ मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून याच्या मदतीने हा पेन एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दहा तासांचा बॅकअप देणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी असणारे रिमोटदेखील दिलेला आहे. याच्या मदतीने प्रेझेंटेशन तयार करतांना कॅमेरा, एयर जेस्चर आणि क्लिकरचा सपोर्ट दिलेला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस६ या मॉडेलमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस तंत्रज्ञानाचा सपोर्ट असणारे चार दर्जेदार स्पीकर्स दिलेले असून याच्या मदतीने सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. तथापि, यात हेडफोन जॅक दिलेले नसल्याची बाब लक्षात घेण्याजोगी आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, या मॉडेलमध्ये १०.५ इंच आकारमानाचा आणि डब्ल्यूक्यूएक्सजीए अर्थात २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा, सुपर अमोलेड या प्रकारचा टचस्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे. या स्क्रीनवर इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर आहे. याची रॅम ६ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यात १३ आणि ५ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर याच्या पुढील बाजूस ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. फास्ट चार्जींगच्या तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ७,०४० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे असून यावर वन युआय १.५ हा युजर इंटरफेस दिलेला आहे. यात अद्ययावत डेक्स देण्यात आलेले आहे. याच्या सोबत विलग होणारा कि-बोर्डदेखील लाँच करण्यात आलेला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस६ या मॉडेलचे मूल्य ५९,९९० रूपये असून याला अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट व सॅमसंग स्टोअरवरून उपलब्ध करण्यात आले आहे. तर यासोबतचा किबोर्ड ५,४९९ रूपयात उपलब्ध करण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here