सॅमसंगने आपला गॅलेक्सी टॅब एस ६ लाईट हा टॅबलेट भारतीय बाजारपेठेत सादर केला असून याची अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
सॅमसंगने जागतिक बाजारपेठेत आधीच गॅलेक्सी टॅब एस ६ लाईट हे मॉडेल सादर केले आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे गॅलेक्सी टॅब एस ६ या मॉडेलची थोडे कमी फिचर्स असणारी आवृत्ती आहे. आता हा टॅबलेट भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. हे मॉडेल ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेजच्या पर्यायात एलटीई व वाय-फाय या दोन प्रकारांमध्ये अनुक्रमे २७,९९९ आणि ३१,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आलेले आहे. हा टॅबलेट ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये १७ जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असून याची अमेझॉन इंडियावरून अगावू नोंदणी सुरू झालेली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस ६ लाईट हे मॉडेल अंगोरा ब्ल्यू, शिफॉन पिंक आणि ऑक्सफर्ड ग्रे या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. यामध्ये १०.४ इंच आकारमानाचा आणि २००० बाय १२०० पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑटो-फोकस या प्रणालीसह ८ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा दिलेला असून सेल्फी व व्हिडीओ कॉलींगसाठी ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. हा टॅबलेट अँड्रॉइड १० या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा वय युआय २.० हा युजर इंटरफेस दिलेला आहे. यातील बॅटरी ७०४० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १३ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, ऑडिओ जॅक आदी पर्याय दिलेले आहेत. यावर सॅमसंगच्या एस पेन या स्टायलस पेनच्या मदतीने रेखाटन करण्याची सुविधा देखील युजरला मिळणार आहे.