टिकटॉकचे दोन अब्ज डाऊनलोड; भारतात सर्वाधीक युजर्स

0

टिकटॉक या शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपने दोन अब्ज डाऊनलोडचा महत्वाचा टप्पा पार केला असून यातील सर्वाधीक युजर्स हे भारतातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टिकटॉक अ‍ॅपने दोन अब्ज डाऊनलोडचा टप्पा पार केल्याची माहिती सेन्सर टॉवर या ख्यातप्राप्त संस्थेने जाहीर केली आहे. अर्थात, अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींच्या एकूण २०० कोटी युजर्सनी हे अ‍ॅप आपापल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केले आहे. यात अँड्रॉइड प्रणालीचे सर्वाधीक म्हणजे तब्बल दीडशे कोटी युजर्स असून उर्वरित ५० कोटी हे आयओएस तसेच अन्य प्रणालींचे असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. थर्ड पार्टी इन्टॉलची आकडेवारी यात घेण्यात आलेली नाही. हा आकडा धरल्यास टिकटॉकच्या युजर्सची संख्या ही यापेक्षा अजन जास्त असून शकते. तसेच लक्षणीय बाब म्हणजे टिकटॉकच्या एकूण वापरकर्त्यांपैकी तब्बल ३० टक्के युजर्स हे भारतीय आहेत. म्हणजेच सुमारे ६० कोटी भारतीय लोक टिकटॉकचा वापर करत आहेत. हा आकडा फेसबुक व व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सपेक्षाही जास्त असल्याची बाब लक्षणीय आहे.

टिकटॉक हे अ‍ॅप अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. हे अ‍ॅप युजर्सची गोपनीय माहिती जमा करून चीन सरकारकडे सुपूर्द करत असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. तर यावरील हिंसक, लैंगीक व फेक कंटेंटदेखील बर्‍याचदा वादाच्या भोवर्‍यात सापडलेले आहे. असे असले तरी याच्या लोकप्रियतेचा वेग कमी होत नसल्याचे या ताज्या आकडेवारीतून अधोरेखीत झालेले आहे. या मंचावरील बरेच व्हिडीओ हे सोशल मीडियात व्हायरल होत असून याला चांगली पसंत मिळत असल्याचे दिसून येत आहे. कदाचित याचमुळे वादग्रस्त असूनही टिकटॉकच्या लोकप्रियतेचा आलेख वाढत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.

टिकटॉकच्या वाढत्या लोकप्रियतेचा फेसबुक व याच्या मालकीच्या अन्य अ‍ॅप्सच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फेसबुक, फेसबुक मॅसेंजर, व्हाटसअ‍ॅप व इन्स्टाग्रामचे एकछत्री वर्चस्व यामुळे कमी होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे टिकटॉकच्या घोडदौडीला अटकाव घालण्यासाठी मार्क झुकरबर्गला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here