टिकटॉक करणार इन्स्टाग्रामची नक्कल !

0

टिकटॉकच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात येत असून या माध्यमातून इन्स्टाग्रामची नक्कल करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक-दुसर्‍यांची नक्कल करणे ही बाब नवी नाही. स्पर्धकांवर मात करण्यासाठी त्यांच्या फिचर्सची कॉपी करण्याची अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात दिसून आली आहेत. यात फेसबुकचा क्रमांक आघाडीवर आहे. फेसबुकने आपल्या अ‍ॅपसह स्वत:ची मालकी असणार्‍या इन्स्टाग्राम आणि व्हाटसअ‍ॅपमध्ये अन्य अ‍ॅपमधील उधार फिचर्स दिले आहेत. यात स्नॅपचॅट या अ‍ॅपमधील तुफान लोकप्रिय झालेल्या स्टोरीज या फिचरची तंतोतंत नक्कल फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअ‍ॅपमध्ये करण्यात आली आहे. तर अलीकडच्या काळाचा विचार केला असता, अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेल्या टिकटॉक या शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग मंचाची कॉपी करण्याचे प्रयत्नदेखील आता फेसबुकने सुरू केले आहेत. हे सारे होत असतांना आता टिकटॉकनेही याचाच कित्ता गिरवत इन्स्टाग्राम अ‍ॅपप्रमाणे आपल्या युजर्सला प्रोफाईल प्रदान करण्याची तयारी सुरू केली आहे.

द व्हर्ज या टेक पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार टिकटॉक लवकरच आपल्या अ‍ॅपची नवीन डिझाईन सादर करणार आहे. यात थेट इन्स्टाग्राम या फोटो व व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपनुसार युजर इंटरफेस प्रदान करण्यात येणार आहे. काही युजर्सच्या माध्यमातून याची चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. या संदर्भात द व्हर्जतर्फे विचारणा करण्यात आली असता टिकटॉकच्या प्रवक्त्याने आपल्या युजर्ससाठी नवीन डिझाईन देण्यात येत असून यात युजर प्रोफाईल हे अधिक आकर्षक आणि सुटसुटीत करण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

टिकटॉकने अलीकडच्या काळात दीड अब्ज अर्थात दीडशे कोटी डाऊनलोडचा टप्पा पार केला आहे. यातील ४६.६ कोटी युजर्स भारतातील आहेत. भारतात या अ‍ॅपने अक्षरश: धमाल केली असून याला प्रत्येक सेकंदाला अनेक नवीन युजर्स जुडत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, टिकटॉकने आता रिडिझाईन करतांना फेसबुकचे कॉप करण्याचे धोरण त्यांच्यावरच उलटवण्याची तयारी सुरू केल्याने टेकविश्‍वात कुतुहलाचे वातावरण पसरले आहे. तर ताज्या वृत्तानुसार येत्या काही दिवसांमध्ये टिकटॉकच्या सर्व युजर्सला नवीन प्रोफाईल वापरण्यासाठी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here