ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी सज्ज विवो व्ही १९ दाखल

0

विवो कंपनीने व्ही १९ हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून यात ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांसह अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

लॉकडाऊन सुरू असतांनाच अनेक कंपन्या आपापले नवीन स्मार्टफोन्स सादर करत आहेत. यात आता विवो व्ही १९ या मॉडेलची भर पडली आहे. ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन अनुक्रमे २७९९० आणि ३१९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आलेला आहे. ग्राहक याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रकारात खरेदी करू शकणार आहे.

वर नमूद केल्यानुसार विवो व्ही १९ या मॉडेलमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. यात ३२ आणि ८ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यातील पहिला मुख्य कॅमेरा असून याला दुसर्‍या सुपर वाईड अँगलयुक्त कॅमेर्‍याची जोड दिलेली आहे. यात एआय ब्युटी आणि सुपर नाईट मोड दिलेले आहेत. तर याच्या मागील बाजूस क्वॉड कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला ८ मेगापिक्सल्सचे अल्ट्रा वाईड लेन्स, २ मेगापिक्सल्सचे मॅक्रो लेन्स व २ मेगापिक्सल्सच्या बोके कॅमेर्‍याची जोड दिलेली आहे. याच्या मदतीने अतिशय दर्जेदार अशा प्रतिमा व व्हिडीओ घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, विवो व्ही १९ या मॉडेलमध्ये ६.४४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. हा डिस्प्ले थ्रीडी व वक्राकार या प्रकारातील असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ६ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यात एचडीआर १० आणि ड्युअल आयव्ह्यू डिस्प्ले हे फिचर प्रदान करण्यात आलेले आहेत. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७१२ हा गतीमान प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे दोन व्हेरियंट ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. विवोने विकसित केलेल्या फ्लॅशचार्ज २.० या तंत्रज्ञानाचे युक्त असणार्‍या चार्जरने युक्त यातील बॅटरी ४५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यातील चार्जर हे ० ते ७० टक्के बॅटरी फक्त ४० मिनिटांमध्ये चार्ज करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात कॉपर ट्युब कुलींग प्रणालीचा वापर केलेला आहे. यामुळे हा फोन बराच वेळ वापरला तरी गरम होत नसल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here