व्हाटसअ‍ॅपच्या गुगल ड्राईव्हवरील बॅकअपला मिळणार अभेद्य सुरक्षा कवच !

0

व्हाटसअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतांना याला अभेद्य सुरक्षा कवच प्रदान करण्याची तयारी सुरू केली आहे.

व्हाटसअ‍ॅपवरील चॅट हिस्ट्रीचा बॅकअप आपण अगदी सहजपणे गुगल ड्राईव्हवर घेऊ शकतो. तथापि, यात सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा विषय आहे. म्हणजे व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरवर एंड-टू-एंड या प्रकारातील एनक्रिप्शन प्रदान करण्यात आले असले तरी याला जेव्हा गुगल ड्राईव्हवर सेव्ह केले जाते तेव्हा हे संरक्षक कवच नसते. यामुळे माहितीच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असतो. नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन, आता व्हाटसअ‍ॅपने गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतांना सुरक्षा कवच प्रदान करण्याची तयारी सुरू केली आहे. व्हाटसअ‍ॅपच्या सर्व आगामी फिचर्सबाबत अतिशय तंतोतंत भाकित करणार्‍या WaBetaInfo या संकेतस्थळाने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

या वृत्तानुसार युजर्सला लवकरच गुगल ड्राईव्हसाठी बॅकअप घेतांना याला एंड-टू-एंड एनक्रिप्शन प्रदान करता येणार आहे. अर्थात, गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतांना याला पासवर्डने सुरक्षित करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. युजरने हा पर्याय निवडून आपला बॅकअप पासवर्डने सुरक्षित केल्यास कुणीही त्रयस्थ याला पाहू शकणार नाही. अगदी गुगल अथवा व्हाटसअ‍ॅपही यात डोकावून पाहू शकणार नसल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आलेला आहे.

व्हाटसअ‍ॅपवरील माहिती ही सुरक्षित असली तरी ती थर्ड पार्टी टुल्सकडे हस्तांतरीत करतांना यात असणारे अभेद्य सुरक्षा कवच कुचकामी ठरत असते. यामुळे युजरच्या गोपनीयतेचा प्रश्‍न उपस्थित होत असतो. नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन, व्हाटसअ‍ॅपने गुगल ड्राईव्हसाठीच्या बॅकअपला पासवर्डने सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. हे फिचर अद्याप अगदी प्राथमिक अवस्थेत आहे. याची चाचणी घेण्यात येत असून ती पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा प्रयोगात्मक आवृत्ती अर्थात बीटा व्हर्जन वापरणार्‍यांसाठी याला प्रदान करण्यात येईल. यानंतर सर्व युजर्स हे फिचर वापरू शकणार आहेत. मार्क झुकरबर्ग याने आधीच फेसबुक, मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअ‍ॅप या चारही सेवांना इंटर कनेक्ट करण्याचे संकेत दिले आहेत. तथापि, हे करतांना युजर्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन दुसर्‍या सेवेकडे व्हाटसअ‍ॅपवरील माहिती हस्तांतरीत करतांनाही ती सुरक्षित रहाण्याची तजवीज या नवीन फिचरच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here