शाओमीचा किफायतशीर रेडमी ७ ए स्मार्टफोन दाखल

0

शाओमीने भारतीय ग्राहकांना रेडमी ७ ए हा अत्यंत किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये सादर केला आहे.

शाओमीने आधी रेडमी ४ए, ५ए आणि ६ए हे मॉडेल्स लाँच केले असून याला ग्राहकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज याच मालिकेतील रेडमी ७ ए हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. याला २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे ५,९९९ आणि ६,१९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. हे दोन्ही व्हेरियंट ग्राहकांना ११ जुलैपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलसह मी.कॉम या संकेतस्थळावरून खरेदी करता येणार आहे. लाँचींग ऑफर म्हणून ग्राहकाला दोन्ही व्हेरियंटवर दोनशे रूपयांची सूट देण्यात येत आहे.

रेडमी ७ या मॉडेलला पी२आय या मटेरियलचे कोटींग करण्यात आले असून यामुळे याला वॉटरप्रूफचे कवच मिळाले आहे. यात ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३९ हा प्रोसेसर दिला आहे. वर नमूद केल्यानुसार यात २/३ जीबी रॅम आणि १६/३२ जीबी स्टोअरेज असे पर्याय दिलेले आहेत. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असून यात एआय ब्युटी, ऑटो-फोकस, एलईडी फ्लॅश आदी फिचर्स आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यात फास्ट चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा मीयुआय १० हा युजर इंटरफेस देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here