शाओमीने भारतीय ग्राहकांसाठी मी इलेक्ट्रीक टुथब्रश सादर केला असून यात तब्बल २५ दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आलेला आहे.
शाओमी कंपनी ही वैविध्यपूर्ण प्रॉडक्टसाठी ख्यात आहे. स्मार्टफोनच नव्हे तर विविध उपकरणांच्या निर्मितीसाठी शाओमी प्रसिध्द झालेली आहे. या कंपनीने आधीच बाजारपेठेत विविधांगी प्रॉडक्ट लाँच केले आहेत. अलीकडे शाओमीने स्मार्ट होम या संकल्पनेशी संबंधीत उपकरणांवर भर दिल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने आज कंपनीने मी इलेक्ट्रीक टुथब्रश टी३०० लाँच केला आहे. नावातच नमूद असल्यानुसार हा टुथब्रश इलेक्ट्रीक चार्जींगवर चालणारा आहे. यात अतिशय दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २५ दिवसांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे मॉडेल आयपी-एक्स७ या मानांकनानुसार तयार करण्यात आले असून याला किती वेळेसही धुता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात मॅग्नेटिक लेव्हीटेशन मोटर दिलेली आहे. यामुळे हा ब्रश एका मिनिटात तब्बल ३१०० वेळा व्हायब्रेट होतो. परिणामी दातांच्या कान्याकोपर्यात असणारी अन्नाचे कण आणि अन्य घाण अतिशय परिणामकारक पध्दतीत बाहेर काढली जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यासोबत कंपनीने तीन ब्रश हेड दिलेले आहे. यामुळे याला बदलून कुटुंबातील अन्य सदस्य याचा वापर करू शकतात. दररोज वापर केला तरी एक ब्रश हेड हे सुमारे चार महिन्यांपर्यंत टिकू शकते असा दावा कंपनीने केला आहे.
शाओमीने हा टुथब्रश आधीच बाजारपेठेत लाँच केलेला असला तरी भारतात सादर करण्यात मॉडेलमध्ये यातील काही फिचर्स दिलेले नाहीत. यात अॅपची कनेक्टीव्हिटी दिलेली नाही. अर्थात, हा अपवाद वगळता यातील सर्व फिचर्स या मॉडेलमध्ये दिलेले आहे. याचे मूल्य १,२९९ असून याला शाओमीच्या संकेतस्थळावरून खरेदी करता येणार आहे.