शाओमीची ‘के’ मालिका लाँच : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

शाओमीने ‘के’ मालिकेत रेडमी के २० प्रो आणि रेडमी २० हे दोन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केले असून यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर व पॉप सेल्फी कॅमेर्‍यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत.

गत अनेक दिवसांपासून शाओमी कंपनीतर्फे नवीन मालिका सादर करण्यात येणार असल्याचे टिझर्स जारी करण्यात येत होते. या अनुषंगाने आज रेडमी के २० प्रो आणि रेडमी २० हे के मालिकेतील दोन नवीन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. याची खासियत म्हणजे या दोन्ही मॉडेल्समध्ये इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आले आहे. अर्थात हे स्कॅनर मागील बाजूस नव्हे तर डिस्प्लेवर असणार आहे. तसेच यासोबत पॉप-अप या प्रकारातील सेल्फी कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. याच्या जोडीला यात अनेक सरस फिचर्सदेखील देण्यात आले आहेत.

रेडमी के २० प्रो

शाओमीने रेडमी के २० प्रो हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये सादर केला आहे. यात ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज व ८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज हे मॉडेल्स अनुक्रमे २७,९९९ आणि ३०,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहेत. हे मॉडेल ग्लेशियर ब्ल्यू, फ्लेम रेड आणि कार्बन ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. यात ६.३९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२३४० बाय १०८० पिक्सल्स) व सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ हा गतीमान प्रोसेसर असून यासोबत ग्राफीक्स प्रोसेसर असल्याने गेमिंगचा चांगला आनंद घेता येणार आहे. यात गेम टर्बो २.० ही प्रणाली असल्यामुळे गेमर्सला दर्जेदार व्हिज्युअल्स, ध्वनी व स्पर्शाची अनुभूती मिळणार आहे. तर यातील आठ पदरी कुलींग प्रणालीमुळे कितीही वेळ गेम्स खेळला तरी स्मार्टफोन गरम होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा सोनी आयएमक्स ५८६ सेन्सर असून याला १३ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा व ८ मेगापिक्सल्सच्या टेलीफोटो लेन्स कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. याच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा आणि व्हिडीओ चित्रीकरण शक्य असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर यात पॉप-अप या प्रकारातील २० मेगापिक्सल्सचा सेल्फी कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये २७ वॅट फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

रेडमी के २०

शाओमीने रेडमी के २० हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज व ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे २१,९९९ आणि २३,९९९ रूपये मूल्यात सादर केला आहे. यातील बहुतांश फिचर्स हे रेडमी के २० प्रो या मॉडेल्सनुसारच आहेत. प्रमुख फरक हा प्रोसेसरमध्ये असून यात स्नॅगड्रॅगन ७३० हा प्रोसेसर दिलेला आहे. तर यातील बॅटरी ही १८ वॅट फास्ट चार्गींग तंत्रज्ञानाने युक्त आहे.

रेडमी के २० आणि रेडमी के २० प्रो हे मॉडेल्स २२ जुलैपासून मी.कॉम आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here