शाओमीने भारतीय ग्राहकांना रेडमी ८ ए हा स्मार्टफोन सादर केला असून याला दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
शाओमीने किफायतशीर मूल्यात अनेक सरस फिचर्स असणार्या मॉडेल्सला सातत्याने प्राधान्य दिले आहे. यात एंट्री लेव्हलच्या विभागातही शाओमीचा मोठा वाटा आहे. दरम्यान, याच विभागात शाओमी रेडमी ८ ए हे मॉडेल आज लाँच केले आहे. आधी सादर केलेल्या रेडमी ७ ए या मॉडेलची ही पुढील आवृत्ती आहे. याला २ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे ६,४९९ आणि ६,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हे दोन्ही व्हेरियंट ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येतील. यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टने युक्त असणारी तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ही बॅटरी प्रदीर्घ बॅकअप देण्यास सक्षम असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
रेडमी ८ ए या मॉडेलमध्ये ६.२२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण दिलेले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४३९ हा प्रोसेसर आहे. याच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचा तर पुढे ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. या दोन्ही कॅमेर्यांमध्ये एआय पोर्ट्रेट मोड दिलेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा आहे.