अँड्रॉइडची दशकपूर्ती : जाणून घ्या ‘नंबर वन’ प्रणालीची यशस्वी वाटचाल !

0

अँड्रॉइड या जगात सर्वाधीक वापरल्या जाणार्‍या ऑपरेटींग सिस्टीमच्या आगमनाची दशकपूर्ती होत असून यानिमित्त अँड्रॉइडच्या धडाकेबाज वाटचालीचा हा आढावा.

आज अँड्रॉइड हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनाशी एकरूप झाला आहे. स्मार्टफोनसह विविध उपकरणांमध्ये जगभरात ही प्रणाली सर्वाधीक जास्त प्रमाणात वापरली जात आहे. आता या प्रणालीस दहा वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या ओएसच्या वाटचालीचा हा त्रोटक आढावा. कोणत्याही उपकरणातील दोन महत्वाचे भाग म्हणजे त्याचे बाह्यांग अर्थात हार्डवेअर आणि अंतरंग म्हणजेच सॉप्टवेअर. ऐशीच्या दशकाच्या मध्यापासून सुरू झालेल्या संगणक क्रांतीचा मायक्रोसॉफ्टला लाभ झाला. या कंपनीने आपल्या विंडोज या प्रणालीच्या माध्यमातून पीसीचे मार्केट काबीज केले. अर्थात ही ऑपरेटींग सिस्टीम पेड या प्रकारातील होती. म्हणजे यासाठी पैसे मोजावे लागत असत. इंटरनेटच्या आगमनानंतर याच्या अगदी विरूध्द मुक्तस्त्रोत म्हणजेच मोफत या प्रकारातील सॉफ्टेवेअर्सची चळवळ सुरू झाली. यात लिनक्सने विंडोजच्या मिरासदारीला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला. याच अनुषंगाने एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी लिनक्सवर आधारित मोबाईल उपकरणांसाठी ऑपरेटींग सिस्टीम सुरू करण्याचा प्रयत्न अँड्रॉइड कंपनीच्या माध्यमातून सुरू झाला. गुगलने अँड्रॉईड कंपनीला २००५ साली अधिग्रहीत केले. यानंतर या कंपनीच्या माध्यमातून मोबाईलसह अन्य उपकरणांसाठी लिनक्स या मुक्तस्त्रोत प्रणालीवर आधारित ऑपरेटींग सिस्टीम विकसित करण्याला वेग आला.

२००७ साली अ‍ॅपलने आयफोनच्या माध्यमातून स्मार्टफोन निर्मितीत बाजी मारली असतांना याच वर्षी गुगलने अँड्रॉईड या मोबाईल ऑपरेटींग सिस्टीमची घोषणा केली. एकीकडे अ‍ॅपलने मोबाईल हँडसेट निर्मितीत पदार्पण केल्यामुळे धास्तावलेल्या अन्य कंपन्यांनी अँड्रॉइड प्रणालीचा स्वीकार करण्याचे जाहीर केले. यामध्ये एचटीसी, मोटोरोला, सॅमसंग आदी मातब्बर कंपन्यांचा समावेश होता. २३ सप्टेंबर २००८ रोजी एचटीसी कंपनीने सादर केलेला एचटीसी ड्रीम हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. हा अँड्रॉइडवरील पहिला स्मार्टफोन होता. तेव्हापासून सुरू झालेली अँड्रॉईडची घोडदौड कायम आहे. खरं तर आयओएस, विंडोज, सिंबीयन, बाडा, ब्लॅकबेरी आदींसह अनेक प्रणालींनी अँड्रॉईडला टक्कर देण्याचा प्रयत्न केला तरी यात त्यांना फारसे यश आले नाही. आज जगातील तब्बल ७६ टक्के स्मार्टफोन्स आणि अन्य मोबाईल डिव्हाईसेसमध्ये अँड्रॉईड ही प्रणाली वापरली जात आहे. आजवर या प्रणालीच्या नऊ आवृत्त्या सादर करण्यात आल्या असून अलीकडेच अँड्रॉईड ९.० पी अर्थात पाई ही आवृत्ती वापरात आली आहे.

अँड्रॉइडच्या वर्चस्वासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. यापैकी एक म्हणजे ही प्रणाली लिनक्स या मुक्तस्त्रोत ऑपरेटींग सिस्टीमपासून विकसित करण्यात आली आहे. यामुळे याच्या विकासात जगभरातील डेव्हलपर्स आपापले योगदान देत असतात. एका अर्थाने ही प्रणाली अतिशय विकसित आणि अर्थातच गतीमान आहे. या प्रणालीची घोडदौड प्रचंड वेगाने सुरू असून येत्या काळात अँड्रॉइडला कुणी आव्हान देण्याची शक्यता तशी धुसरच असल्याचे दिसून येत आहे. आता तर अँड्रॉइडचा प्रचंड प्रमाणात विस्तार झाला आहे. आता फक्त स्मार्टफोन वा टॅबलेटच नव्हे तर अन्य उपकरणांमध्येही या प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. स्मार्ट टिव्हीसाठी यावर आधारित प्रणाली कार्यान्वित झाली आहे. अँड्रॉइड वेअर ही प्रणाली वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांमध्ये वापरली जात आहे. तर अँड्रॉइड ऑटोचा वापर चारचाकी वाहनांमध्ये प्रचलीत झाला आहे. यामुळे अँड्रॉइडच्या घोडदौडीला कुणी आव्हान देऊ शकेल अशी शक्यता सध्या तरी दिसून येत नाही.

आपणास माहित आहे का?

अँड्रॉइडच्या प्रत्येक आवृत्तीचे नामकरण हा जगभरातील कोट्यवधी युजर्ससाठी औत्सुक्याचा मुद्दा बनत असल्याचे आता दिसून येत आहे. आजवर अँड्रॉइड प्रणालीच्या विविध आवृत्त्यांना जगाच्या विविध भागात लोकप्रिय असणारे मिष्ट पदार्थ, मिठाई, चॉकलेटस, पेय, झेडर्टस् आदींवरून नावे ठेवण्यात आली आहेत. यात इंग्रजीतील अल्फाबेटनुसार पहिल्या दोन आवृत्तींना अल्फा आणि बीटा नाव देण्यात आले. मात्र यानंतर कपकेक (आवृत्ती १.५), डोनट (१.६), एक्लेअर्स (२.० व २.१), फ्रोयो (२.२ आणि २.२.३) जिंजरब्रेड (२.३ आणि २.३.७) हनीकोंब (३.० आणि ३.२.६) आईसक्रीम सँडविच (४.० आणि ४.०.४), जेली बीन (४.१ आणि ४.३.१), किटकॅट (४.४-४.४.४ आणि ४.४ डब्ल्यू-४डब्ल्यू.२), लॉलिपॉप (५.० आणि ५.१), मार्शमॅलो (आवृत्ती ६.०) आणि अँड्रॉईड ७.० या आवृत्तीला नोगट तर अँड्रॉइड ओ म्हणजेच ८.० ही आवृत्ती ओरिओ असे नाव देण्यात आलेले आहे. अलीकडेच अँड्रॉइड ९.० ही आवृत्ती आली असून याला पाई या मिष्ट पदार्थाचे नाव देण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here