अँड्रॉइड पी प्रणालीची घोषणा : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

गुगलच्या आजपासून सुरू झालेल्या आय/ओ परिषदेत अँड्रॉइड या ऑपरेटींग सिस्टीमची पी ही नवीन आवृत्ती घोषीत करण्यात आली आहे.

गुगलच्या आय/ओ परिषदेच्या पहिल्या दिवशी कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी विविध महत्वपूर्ण घोषणा केल्या. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीमच्या पी या आवृत्तीची घोषणा ठरली. या प्रणालीचा डेव्हलपर्ससाठी असणारा दुसरा प्रिव्ह्यू सादर करण्यात आला असून आता ही प्रणाली कुणीही बीटा म्हणजेच प्रयोगात्मक अवस्थेत वापरू शकतो. अर्थात यासाठी संबंधीत युजरने अँड्रॉइड बीटा प्रोग्रॅमसाठी साईनअप केलेले असणे आवश्यक आहे. तसेच गुगलच्या पिक्सेल मालिकेतील स्मार्टफोनसह अन्य मोजक्या उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सच्या युजर्सला याचा वापर करता येणार आहे. या आवृत्तीची खासियत म्हणजे यात प्रथमच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स अर्थात कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात नवीन सुलभ इंटरफेस देण्यात आला आहे. अँड्रॉइड पी आवृत्तीतील विशेष फिचर्स खालीलप्रमाणे आहेत.

* अँड्रॉइड प्रणालीच्या पी आवृत्तीमध्ये आयफोनप्रमाणे अतिशय सुलभ अशी नेव्हिगेशन प्रणाली देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत होम या बटनवर क्लिक करून एकाच ठिकाणी सर्व अ‍ॅप्स पाहणे शक्य आहे. यामुळे स्मार्टफोनवर वारंवार टॅप वा स्वाईप करण्याची गरज पडणार नाही.

* अँड्रॉइड पी प्रणालीत स्वतंत्र डॅशबोर्ड देण्यात आला असून यात युजरने आपला स्मार्टफोन कितीदा अनलॉक केला? यातील कोणत्या अ‍ॅपचा कितीदा वापर केला? दिवसभरात किती नोटिफिकेशन्स आलेत? याची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी पाहता येईल.

* अँड्रॉइड पी मध्ये कोणत्याही अ‍ॅपचा दररोज नेमका किती वापर करावा? याची काल मर्यादा आखता येणार आहे. या मर्यादेनंतर ते अ‍ॅप आपोआप बंद होईल. यामुळे विशेष करून स्मार्टफोनवर तास-न-तास घालविणार्‍या बालकांना शिस्त लावण्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरू शकते.

* अँड्रॉइड पी प्रणालीत शुश हे स्वतंत्र फिचर देण्यात येणार आहे. यात कुणीही आपला स्मार्टफोनचा स्क्रीन आपल्या नजरेच्या विरूध्द बाजूस केल्यास डू नॉट डिस्टर्ब हे फिचर आपोआप सुरू होणार आहे.

* अँड्रॉइड पी या प्रणालीतील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे अ‍ॅडाप्टीव्ह बॅटरी होय. खरं तर, प्रत्येक अँड्रॉइड युजरसाठी बॅटरी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. स्मार्टफोन युजरची बॅटरी ही विविध अ‍ॅप्सच्या वापरांमुळे लवकरच समाप्त होत असते. नेमकी हीच बाब लक्षात घेत गुगलने या ताज्या आवृत्ती बॅटरीवर लक्ष केंद्रीत केले आहे. यात कृत्रीम बुध्दीमत्ता आणि मशीन लर्नींगच्या मदतीने स्मार्टफोन युजरच्या दैनंदिन वापराचा पॅटर्न लक्षात घेतला जातो. यानंतर संबंधीत युजरच्या कोणत्या अ‍ॅपसाठी किती उर्जा लागणार असल्याचे त्याला सांगण्यात येते.

* या प्रणालीच अ‍ॅडाप्टीव्ह ब्राईटनेस ही सुविधादेखील देण्यात आली आहे. अँड्रॉइड प्रणालीत आधीच असणार्‍या ऑटो-ब्राईटनेस या सुविधेपेक्षाही ही अधिक कार्यक्षम असून यात प्रत्येक युजरच्या दैनंदिन वापरावरून त्याची बॅटरी दीर्घ काळपर्यंत चालावी यासाठी सजेशन देणार आहे.

* अँड्रॉइड पी प्रणालीत अ‍ॅप अ‍ॅक्शन हे फिचर देण्यात आले असून याच्या मदतीने युजरने कोणतेही अ‍ॅप वापरण्यास प्रारंभ करताच त्याच्याशी संबंधीत बाबी आपोआप स्क्रीनवर येणार आहेत. तसेच याच्याच जोडीला स्लाईसेस हे फिचरदेखील दिले आहे. तर डेव्हलपर्ससाठी या फिचर्सचा आपापल्या अ‍ॅपमध्ये समावेश करण्यासाठी एमएल किटदेखील सादर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here