अमेझॉन इंडियाचे आता हिंदीत संकेतस्थळ

0
अमेझॉन इंडिया, amazon india hindi

अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलने आता हिंदीत आपली मोबाईल वेबसाईट सुरू केली असून या माध्यमातून आपला युजर बेस वाढविण्याची रणनिती आखली आहे.

भारतात इंटरनेट युजर्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असली तरी त्या तुलनेत भारतीय भाषांमधील कंटेंट वाढत नसल्याची बाब कधीपासूनच अधोरेखीत झालेली आहे. भारतीयांच्या इंटरनेट वापरात फक्त १ टक्के मजकूर हा भारतीय भाषांमधील असल्याचेही अलीकडेच समोर आलेले आहे. भारतीयांना इंग्रजी कामचलावू स्वरूपाची येत असली तरी बहुतांश जणांना हाच मोठा अडसर असल्याची बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. या पार्श्‍वभूमिवर, विविध टेक कंपन्यांनी भारतीय भाषांना प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे. या अनुषंगाने आता अमेझॉन इंडिया या मातब्बर ई-कॉमर्स कंपनीने आपल्या मोबाईल वेबसाईटला हिंदीत सादर केले आहे. अमेझॉनच्या स्मार्टफोन अ‍ॅपवरही हा पर्याय सादर करण्यात आला आहे. तर लवकरच डेस्कटॉपवरही ही सुविधा देण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यानंतर मराठीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आदींसह अन्य भारतीय भाषांमध्ये अमेझॉनचे संकेतस्थळ सादर करण्यात येणार आहे.

अमेझॉन इंडियाच्या हिंदी संकेतस्थळाचा युजर इंटरफेस हा अतिशय सुलभ आणि कुणालाही कळेल असाच आहे. यावरून कुणीही विविध डील्स, ऑफर्स आदींसह सर्व प्रॉडक्टचे सविस्तर विवरण तसेच ऑर्डर देण्यापासून ते मिळण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया हिंदी भाषेत वाचू शकणार आहे. संकेतस्थळावरील काही भाग अद्यापही इंग्रजीतच असला तरी याला लवकरच अनुवादीत करण्यात येणार असल्याची माहिती या कंपनीतर्फे देण्यात आली आहे. सध्या ई-कॉमर्सच्या क्षेत्रात अतिशय तुल्यबळ स्पर्धा सुरू झाली आहे. वॉलमार्टने फ्लिपकार्टला अधिग्रहीत केले असून रिलायन्सनेही या क्षेत्रात उडी घेतली आहे. यामुळे अमेझॉन इंडियाला तगडे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्‍वभूमिवर, भारताच्या ग्रामीण भागात आपला युजर्स बेस वाढविण्यासाठी अमेझॉनने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. विशेष करून याच भागातील नवीन १० कोटी ग्राहकांना जोडण्याचे उद्दीष्ट अमेझॉनने आखल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here