अमेझॉन प्राईम सेवेला आव्हान देण्याचा प्रयत्न फ्लिपकार्ट प्लस या सेवेच्या माध्यमातून होणार असून याची आता लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.
भारतीय ई-कॉमर्सच्या क्षेत्रात सध्या प्रचंड घडामोडी होत आहेत. या क्षेत्राला नियंत्रीत करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या असून याचा प्राथमिक मसुदादेखील जाहीर करण्यात आला आहे. याबाबत लवकरच नियमावली जाहीर होणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या मसुद्यातील बाबींचे अवलोकन केले असता विविध सेल आणि डिस्काऊंटच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षीत करण्याच्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्रयत्नांना बर्यापैकी चाप बसणार असल्याचे दिसून येत आहे. यातच वॉलमार्ट या रिटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनीने फ्लिपकार्टला अधिग्रहीत केल्यामुळे अमेझॉनला प्रबळ आव्हान निर्माण झाले आहे. या घडामोडी सुरू असतांना अमेझॉन प्राईमला थेट आव्हान देण्यासाठी फ्लिपकार्ट प्लस ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. आगामी स्वातंत्रदिन अर्थात १५ ऑगस्ट २०१८ पासून ही नवीन सेवा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अमेझॉन प्राईमच्या ग्राहकाला त्याने दिलेल्या ऑर्डरची जलद डिलीव्हरी मिळते. तसेच त्याला कंपनी वेळोवेळी विशेष सवलती तसेच डिस्काऊंटदेखील देत असते. नेमक्या याच पध्दतीने ग्राहकांना विशेष सेवा देण्यासाठी फ्लिपकार्ट प्लस अस्तित्वात येणार आहे.
ही नवीन सेवा घेणार्या ग्राहकांना विविध प्रॉडक्टची जलद डिलीव्हरी मिळणार आहे. त्याला कंपनीतर्फे वेळोवेळी आयोजित करण्यात येणार्या ‘बिग बिलीयन डे’, ‘बिग शॉपींग डे’ आदींमध्ये विशेष सवलती मिळतील. याशिवाय या सेवेमध्ये ‘प्लस पॉइंट’ या नाविन्यपूर्ण प्रणालीचाही समावेश करण्यात येणार आहे. अमेझॉन प्राईम ही सेवा २०१६ सालापासून कार्यान्वित करण्यात आली आहे. याला प्रारंभी ४९९ रूपये इतकी आकारणी करण्यात येत होती. यासाठी आता ९९९ रूपयांची आकारणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर, फ्लिपकार्ट प्लससाठी नेमकी किती आकारणी करण्यात येईल आणि यात कोणत्या बाबींचा समावेश असेल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.