अरे व्वा…फेसबुक प्रोफाईलवर गाणे वापरण्याची सुविधा !

0
फेसबुक प्रोफाईलवर, fecebook profile

फेसबुकने आपल्या युजर्सला त्याच्या प्रोफाईलवर गाणे वापरण्याची अनोखी सुविधा सादर केली असून याच्या जोडीला स्टोरीजमध्येही संगीताचा वापर करता येणार आहे.

फेसबुक ही सोशल साईट आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन सुविधा देत असते. या अनुषंगाने आतादेखील काही भन्नाट फिचर्स देण्यात आले असून याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे आता कुणीही युजर आपल्या प्रोफाईलवर चक्क गाणे वापरू शकणार आहे. यासाठी प्रोफाईलवर स्वतंत्र विभागदेखील देण्यात येणार आहे. यात कुणीही युजर त्याला आवडणारे गाणे अपलोड करू शकेल. त्याच्या प्रोफाईलवर अन्य युजर येऊन या गाण्याचा आनंद घेऊ शकतो. हे गाणे सुरू असतांना संबंधीत चित्रपट वा म्युझिक अल्बम, त्याचा गायक, गीतकार आदींची माहिती समोर दिसणार आहे. हे गाणे समोरचा युजर आपल्या प्रोफाईलवर सुध्दा वापरू शकणार आहे. तर कुणीही युजर त्याला हवे असणारे गाणे या विभागात पीन्ड करून वर ठेवू शकतो. हे गाणे अन्य युजर्स शेअर करू शकणार आहेत. जगभरातील फेसबुक युजर्सला हे नवीन फिचर अपडेटच्या माध्यमातून मिळणार आहे. अर्थात युजर्ससाठी हे फिचर क्रमाक्रमाने कार्यान्वित केले जाणार आहे. यासोबत फेसबुक स्टोरीजवरदेखील आता कुणीही युजर एखादे गीत वा संगीत अ‍ॅड करू शकतो. फेसबुक स्टोरीजचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असतांनाच ही सुविधा तुफान लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. याच्या अंतर्गत शेअर करण्यात येणार्‍या प्रतिमा अथवा व्हिडीओला आता संगीताचा साज चढविता येणार आहे. याच प्रकारे फेसबुकच्या न्यूजफिडमध्येही कुणीही प्रतिमांसोबत संगीत अपलोड करून शेअर करू शकतो.

( जाणून घ्या स्टोरीज म्हणजे काय ?

फेसबुकच्या वेब आणि अ‍ॅप या दोन्ही आवृत्त्यांसाठी स्टोरीज हे फिचर देण्यात आलेले आहे. यामध्ये कुणीही प्रतिमा, व्हिडीओ आणि ध्वनी यांचा मिलाफ करू शकतो. कोणत्याही युजरने आपली स्टोरीज अपलोड केल्यानंतर ती २४ तासांपर्यंत कायम राहते. यानंतर मात्र ही स्टोरी आपोआप नष्ट होते. स्टोरीज या फिचरच्या माध्यमातून अतिशय सृजनशील पध्दतीत आपल्याला हवा तो संदेश पोहचवण्याची सुविधा आहे. आता याचमध्ये जाहिराती येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. )

दरम्यान, फेसबुकने आपल्या युजर्ससाठी लीप सिंक म्युझिक या आधीच प्रदान केलेल्या फिचरच्या कार्यक्षमतेचा विस्तार करण्याचेही जाहीर केले आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर गाजलेल्या गाण्यांच्या शब्दांनुसार आपले ओठ हलवू शकतो. हे फिचर रिअल टाईम या स्वरूपातील आहे. या प्रकारचा लाईव्ह व्हिडीओ सुरू असतांना त्या युजरचे मित्र यावर लाईक/शेअर/कॉमेंट करू शकतात. तसेच या मूळ गाण्याच्या कलावंताला फेसबुकवर फॉलो करण्याची सुविधादेखील यामध्ये देण्यात आली आहे. आता याच फिचरमध्ये युजर म्हणत असणार्‍या गाण्याचे शब्ददेखील दिसण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे.

( टिप : फेसबुकने या फिचर्सबाबत अधिकृत घोषणा केलेली असली तरी याला सर्व युजर्ससाठी रोल-आऊट करण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागू शकतो.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here