अलीबाबा ही विख्यात चिनी ई-कॉमर्स कंपनी लवकरच भारतात दाखल होणार असल्याचे सुतोवाच कंपनीचे प्रेसिडेंट जे मायकल इव्हान्स यांनी केले आहे.
भारतात ई-कॉमर्स क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीवर (एफडीआय) खूप निर्बंध आहेत. यामुळे अलीबाबा आणि अमेझॉनसारख्या विदेशी कंपन्यांची गोची झाली आहे. अमेझॉनने भारतासाठी स्वतंत्र शाखा सुरू केली. अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी मात्र स्नॅपडील, पेटीएम आदींसारख्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा मार्ग पत्करला. खर तर जॅक मा हे दीर्घ काळापासून भारतात व्यवहार सुरू करण्याचे प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींसह विविध मान्यवरांच्या भेटीदेखील घेतल्या आहेत.
या पार्श्वभुमिवर अलीबाबा कंपनीचे प्रेसिडेंट जे मायकल इव्हान्स यांनी येत्या काही महिन्यांमध्ये आपण भारतात पदार्पण करणार असल्याची घोषणा केली आहे. भारत दौर्यावर आलेले इव्हान्स यांनी नुकतीच केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेटदेखील घेतली. त्यांनी अलीबाबा नेमक्या कोणत्या प्रकारे भारतात पदार्पण करणार याबाबत घोषणा केली नसली तरी यामुळे भारतीय ई-कॉमर्सच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.