असा असेल मायक्रोसॉफ्टचा सरफेस स्टुडिओ

0
microsoft-surface-studio-3

मायक्रोसॉफ्टने सरफेस स्टुडिओ या नावाने अतिशय उच्च दर्जाची फिचर्स असणारा आपला पहिलाच ‘डेस्कटॉप’ संगणक सादर केला आहे.

मायक्रोसॉफ्टने न्यूयॉर्क शहरात आयोजित कार्यक्रमात विविध महत्वपूर्ण घोषणा केल्या. यात सरफेस स्टुडिओचे अनावरण करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून मायक्रोसॉफ्ट कंपनी डेस्कटॉप संगणक तयार करत असल्याच्या सुरू असणार्‍या चर्चेवर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. हे मॉडेल विविध व्हेरियंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. हा एक परिपूर्ण तसेच अत्यंत वेगवान ‘ऑल-इन-वन’ संगणक असल्याचा कंपनीचा दावा आहे. अर्थात यातील फिचर्स तसेच तोलामोलाचे आहेत हे नाकारता येणार नाही. यात ४५०० बाय ३००० पिक्सल्स क्षमतेचा आणि २८ इंच आकारचा पिक्सलसेन्स या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ‘फोर-के’पेक्षाही उत्तम दर्जाचा आणि अत्यंत सडपातळ असून विविध अंशात वाकवून वापरता येईल. हे मॉडेल विविध प्रोजेक्टसाठी वापरणे सहजशक्य आहे. यावर रेखाटनासाठी अत्यंत संवेदनशील असा ‘सरफेस पेन’ प्रदान करण्यात आला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर हा पेन तब्बल एक वर्षभर वापरता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. आपण कागदावर पेनाने जितक्या सहजतेने लिहतो अगदी त्याच पध्दतीने याचा उपयोग करून ‘सरफेस स्टुडिओ’वर काम करता येणार आहे. ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी असणारा हा पेन ५९.९९ डॉलर्सला मिळेल.

‘सरफेस स्टुडिओ’सोबत ‘सरफेस डायल’ हे अतिशय भन्नाट उपकरणही मायक्रोसॉफ्टने सादर केले आहे. हे गोलाकार आकाराचे अगदी एखाद्या ‘व्हॉल्युम कंट्रोल’ बटनासारखे दिसणारे आहे. ते ‘सरफेस स्टुडिओ’च्या डिस्प्लेवर कुठेही चिपकवून काम करता येते. याच्या मदतीने कुणीही अगदी सुलभपणे विविध फंक्शन्सचे नियंत्रण करू शकतो. हे उपकरण ग्राहकांना ९९.९९ डॉलर्स मुल्यात मिळेल. ‘सरफेस डायल’ हे ‘सरफेस पेन’ आणि विंडोज १०च्या क्रियेटर्स अपडेटसोबत अतिशय नाविन्यपूर्ण आणि रचनात्मक पध्दतीने वापरता येईल. विविध अ‍ॅप्सच्या मदतीने याच्या गुणवत्तेला नवीन उंचीदेखील प्रदान करता येईल. तसेच ‘सरफेस स्टुडिओ’साठी खास कि-बोर्ड आणि माऊसदेखील लाँच करण्यात आला आहे.

याच्या विविध व्हेरियंटमध्ये इंटेलचे कोअर आय५ आणि आय७ हे प्रोसेसर वापरण्यात आले असून याची रॅम चार ते तब्बल ३२ जीबीइतकी असणार आहे. तर याचे तीन व्हेरियंटस २९९९ ते ४१९९ डॉलर्स इतक्या मूल्यांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. मूल्याचा विचार करता ‘सरफेस स्टुडिओ’ हे मॉडेल अतिशय महागडे असले तरी ते अत्यंत उपयुक्तदेखील आहे. सध्या अमेरिकेत याची पूर्वनोंदणी सुरू झाली असून येत्या काही दिवसांमध्ये हा संगणक भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here