अ‍ॅप वापरत नसतांनाही फेसबुकची युजरच्या माहितीवर नजर

0

अगदी फेसबुकचे अ‍ॅप वापरत नसणार्‍या युजर्सच्याही माहितीवर या सोशल मीडिया साईटची नजर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फेसबुकवरील माहिती सुरक्षित नसल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. यातून अनेक देशांमध्ये फेसबुकवर खटलेदेखील दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, एका ताज्या गौप्यस्फोटामुळे फेसबुक पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चॅरिटी प्रायव्हसी इंटरनॅशनल या ब्रिटनस्थित संस्थेने फेसबुकच्या सुरक्षेतील त्रुटीला चव्हाट्यावर आणले आहे. काही युजर्स सुरक्षेच्या कारणास्तव फेसबुकचा वापर टाळत असतात. या माध्यमातून आपला डाटा सुरक्षित असल्याचा त्यांचा समज असतो. तथापि, प्रत्यक्षात कुणीही युजर जरी फेसबुक वापरत नसला तरीही त्याच्या माहितीची चोरी होत असल्याचा दावा या संस्थेने केला आहे. फेसबुकने जगभरातील डेव्हलपर्ससाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (एसडीके) प्रदान केलेले आहे. याच्या मदतीने कुणीही डेव्हलपर हा कोणत्याही ऑपरेटींग सिस्टीमसाठी अ‍ॅप बनवू शकतो. याच्याच माध्यमातून युजरच्या माहितीवर नजर ठेवली जात असल्याचा गौप्यस्फोट या संस्थेने केला आहे. अर्थात फेसबुक वापरत नसतांनाही युजरच्या स्मार्टफोनमधील सर्व माहिती ही फेसबुककडे जमा होत असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे.

चॅरिटी प्रायव्हसी इंटरनॅशनल या संस्थेने १ कोटी ते ५० कोटी युजर्स असणार्‍या ३४ अँड्रॉइड अ‍ॅप्सची अतिशय सखोल तपासणी केली. यात यातील प्रत्येक अ‍ॅप हे ओपन केल्याबरोबर ते संबंधीत युजरची माहिती ही स्वयंचलीत पध्दतीत फेसबुककडे पाठवत असल्याचे आढळून आले. विशेष बाब म्हणजे ज्या युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक अ‍ॅप नाहीय त्यातही हाच प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे फेसबुककडून होणारा हा प्रकार आता संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. दरम्यान, याबाबत फेसबुकने अद्याप तरी कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here