आता येणार फेसबुकचा स्मार्ट डिस्प्ले; व्हिडीओ चॅटींगसह असतील भन्नाट फिचर्स

0
फेसबुक स्मार्ट डिस्प्ले उपकरण, facebook portal smart display
फेसबुक स्मार्ट डिस्प्ले उपकरणाचे लीक झालेले छायाचित्र.

फेसबुक लवकरच स्मार्ट डिस्प्ले सादर करणार असून यात व्हिडीओ चॅटींगसह अतिशय नाविन्यपूर्ण फिचर्स देण्यात येणार आहेत.

जगभरात सध्या ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडच्या माध्यमातून वापरण्यात येणार्‍या उपकरणांच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतांश कंपन्यांनी आधी या स्वरूपाचे व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट सादर केले. तर नंतर यावर आधारीत विविध उपकरणे लाँच केली. सध्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये या प्रकारातील डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आले आहेत. यासोबत याचा स्मार्ट स्पीकरमधील वापर आता प्रचलीत होत आहे. या क्षेत्रात पहिल्यांदा अमेझॉनने इको या मालिकेत विविध मॉडेल्स सादर केले. यामध्ये अमेझॉननेच विकसित केलेल्या अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटवर आधारित डिजीटल असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यानंतर गुगलने आपल्या गुगल असिस्टंटचा सपोर्ट असणारी होम ही मालिका सादर केली. तर अ‍ॅपलने आपल्या सिरी या असिस्टंटवर आधारित होमपॉड बाजारपेठेत उपलब्ध केले आहेत. तर सॅमसंगनेही अलीकडेच आपल्या बिक्सबी या असिस्टंटचा सपोर्ट असणारे स्मार्ट स्पीकर सादर केले आहेत. आता तर अनेक कंपन्यांनी या प्रकारातील स्मार्ट स्पीकर लाँच केले आहेत. या पाठोपाठ स्मार्ट डिस्प्लेदेखील बाजारपेठेत दाखल झाले आहेत. नावातच नमूद असल्यानुसार या उपकरणात स्मार्ट स्पीकरच्या सर्व सुविधा असून याला डिस्प्लेची जोड देण्यात आलेली असते. अमेझॉनने इको शो व इको स्पॉट या उपकरणांच्या माध्यमातून आघाडी घेतली आहे. यानंतर या क्षेत्रात आता तीव्र स्पर्धा निर्माण होण्याचे संकेत आहेत. कारण गुगलसोबत फेसबुकदेखील लवकरच या प्रकारातील स्मार्ट डिस्प्ले सादर करण्यात येईल अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. याबाबत चेड्डर या पोर्टलने वृत्तात प्रकाशित केला आहे.

या वृत्तानुसार फेसबुकचा आगामी स्मार्ट डिस्प्ले हा व्हिडीओ चॅटींग डिव्हाईसच्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. याला पोर्टल या नावाने लाँच करण्यात येणार असून यामध्ये अमेझॉनच्या अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट राहणार आहे. अर्थात स्मार्ट स्पीकरमधील सर्व सुविधा यात असतील. यामध्ये व्हाईस कमांडच्या मदतीने वृत्त, हवामानाचे अलर्ट, संगीत ऐकण्याची सुविधा दिलेली असेल. याला स्मार्टफोन कनेक्ट करता येईल. यात टचस्क्रीनची सुविधा असणारा डिस्प्ले दिलेला असेल. यामध्ये व्हाईस कमांडसह व्हिडीओदेखील पाहता येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये व्हिडीओ चॅटींगची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी फेसबुकवर लॉगीन करण्याची अट असू शकते. या उपकरणाच्या कॅमेर्‍यात प्रायव्हसी शटरची सुविधा देण्यात येणार आहे. याच्या मदतीने कॅमेर्‍याच्या फ्रेममधील व्यक्तींच्या अचूक ओळखीची खातरजमा करता येणार आहे. तसेच यामध्ये एआय म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स (कृत्रीम बुध्दीमत्ता) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याला दोन पर्यायांमध्ये सादर करण्यात येणार आहे. यातील मोठा डिस्प्ले असणारे उपकरण हे ४०० डॉलर्स तर लहान डिस्प्लेचे मॉडेल ३०० डॉलर्समध्ये बाजारपेठेत सादर करण्यात येईल असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. खरं तर या स्मार्ट डिस्प्लेची कधीपासूनच चाचणी सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here