इन्फ्रा रेड फेस अनलॉकची सुविधा असणारा स्मार्टफोन

0

शाओमी कंपनीने अगदी अंधुक वातावरणातही फेस अनलॉक करण्याची सुविधा असणारा मी ८ हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

अलीकडच्या काळात बहुतांश स्मार्टफोन्समध्ये फेस अनलॉक हे फिचर दिलेले असते. यातच आता फेस अनलॉकमध्येच नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत. यात शाओमी कंपनीने आपल्या मी ८ या नुकत्याच घोषीत केलेल्या स्मार्टफोनमध्ये इन्फ्रारेड फेस अनलॉक हे विशेष फिचर सादर केले आहे. याच्या मदतीने अगदी अंधुक वातावरण असले तरीही फेस अनलॉक करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यासाठी याच्या वरील भागात इन्फ्रारेड लाईट आणि सेन्सरदेखील प्रदान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मॉडेलमध्ये शाओमी कंपनीने पहिल्यांदाच आयफोन-एक्सप्रमाणे नॉचचा वापर केला आहे. याच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचा व्हर्टीकल या प्रकारातील ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये २० मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार करता, शाओमी मी ८ या मॉडेलमध्ये ६.२१ इंच आकारमानाचा आणि २२४८ बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी प्लस क्षमतेचा, फुल व्ह्यू या प्रकारातील व १८:७:९ हा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेजसाठी ६४, १२८ आणि २५६ जीबी असे पर्याय देण्यात आले आहेत. तर यात क्विकचार्ज ४+ तंत्रज्ञानाने युक्त असणारी ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. हा स्मार्टफोन शाओमीने नुकत्याच जाहीर केलेल्या मीयुआय १० या प्रणालीवर चालणारा असेल. पहिल्यांदा हा स्मार्टफोन चीनमध्ये सादर करण्यात आला असून लवकरच भारतीय ग्राहकांसाठी याला सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here